नगर : टाकळी ढोकेश्वरमध्ये रंगणार तिरंगी लढत!

टाकळी ढोकेश्वर, दादा भालेकर : पारनेर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी टाकळी ढोकेश्वर गटासह जवळा, सुपा, निघोज या चार गटांचे आरक्षण सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी निघाले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या गर्दीत वाढ होणार असून, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद कृषी व बांधकाम समितीचे माजी सभापती काशीनाथ दाते, माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी पंचायत समिती सभापती राहुल झावरे, वडगाव सावताळचे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे, गुरुदत्त मल्टिस्टेटचे संस्थापक चेअरमन बा. ठ. झावरे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अॅड. रघुनाथ उर्फ बाबासाहेब खिलारी, नीलेश लंके प्रतिष्ठानचे बाळासाहेब खिलारी आदींच्या पथ्थ्यावर हे आरक्षण पडले आहे. या गटात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच निर्माण होणार आहेत.
टाकळी ढोकेश्वर गण हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सरपंच अरुणा बाळासाहेब खिलारी, माजी पंचायत समिती सदस्या प्रतिभाताई रघुनाथ खिलारी, शिवसेना महिला आघाडा प्रमुख प्रियंका खिलारी, तर वासुंदे गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, सरपंच प्रकाश गाजरे, भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेचे सचिव सुदेश झावरे, अमोल उगले यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत.
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य काशीनाथ दाते यांची गेल्या पाच वर्षांतील विकासकामे पाहता, आजतरी त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. भाजपत गेलेले सुजित झावरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्यापेक्षा काशीनाथ दाते यांचा हा बालेकिल्ला मानला जात आहे. या गटात तिरंगी लढत हाणार हे जवळपास निश्चित आहे.
याबरोबर तालुक्यातील जवळा, सुपा व निघोज गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने या गटांमध्येही रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे. कान्हूर पठार गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाला आहे. ढवळपुरी गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने ढवळपुरी गटातील सरपंच डॉ. राजेश भनगडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहोकले, बाबाजी तरटे, संभाजी रोहोकले, अॅड. राहुल झावरे यांचा हिरमोड झाला आहे.