नगर महापालिकेच्या करवसुली कर्मचार्‍यांना आयुक्तांनी झापले | पुढारी

नगर महापालिकेच्या करवसुली कर्मचार्‍यांना आयुक्तांनी झापले

नगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका हद्दीत वीस वर्षांपासूनचे प्रश्न प्रलंबित आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने खड्डे बजवू शकत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जाऊन कर भरण्यासाठी जनजागृती करा. स्वतःचे कर्तव्य बजवा, कारणे सांगू नका. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत आयुक्त डॉ. प्रदीप जावळे यांनी कर्मचार्‍यांना झापले.

आयुक्त डॉ. जावळे यांनी विभागप्रमुख व वसुली लिपिकांची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. यावेळी उपायुक्त सचिन बांगर, सहाय्यक आयुक्त सचिन राऊत आदींसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. आयुक्त म्हणाले की, मनपा कर्मचारी हेच माझे टार्गेट आहेत. त्यांनी आता मनपा ही माझी संस्था आहे, हे समजून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. मी कुठल्याही कर्मचार्‍यांची तक्रार ऐकून घेणार नाही. मला कुठलेही कारण सांगायचे नाही, तर नगरकरांना तुमच्या माध्यमातून सेवा द्यायची आहे.

मनपा ही नगरकरांना सुविधा देण्यासाठी आहे, तुमच्या पगारासाठी नाही. नागरिकांच्या खिशातून तुमचे पगार करतो. पैशांअभावी खड्डे बुजवू शकत नाही. 20 वर्षांपासून रखडलेले प्रश्नमार्गी लावण्यासाठी नियोजन करा. पैसे भरण्यासाठी नागरिकांची वाट पाहू नका. त्यांच्या घरी जाऊन शास्ती माफीची माहिती द्या. समजावून सांगा शंभर टक्के शास्त्री माफी देऊनही नागरिकांनी जर कर भरला नाही तर जप्ती करून निलाव प्रक्रिया राबविणार नागरिकांनी शास्ती माफीचा लाभ घ्यावा व मानहानी टाळा आपल्याला मनपाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आहे. दिवस रात्र काम करा, हलगर्जीपणा करू नका कर्मचार्‍यांची मानसिकता नकारात्मक असून ती बदला अन्यथा कारवाई करण्यात येईल.

कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या बंद

न्यायालयामध्ये 13 ऑगस्ट रोजी लोक अदालत होत आहे. त्यात 14 हजार थकबाकीची प्रकरणे ठेवायची आहेत. नागरिकांना नोटिसा द्या, संपर्क साधा. एक महिना कर्मचार्‍यांना कुठलीही सुट्टी दिली जाणार नाही. सुट्टीच्या दिवशीही कर भरण्यासाठी ऑफिस सुरू राहतील. कामचुकारांच्या पगार वाढ व पेन्शनवर शेरा मारला जाईल. त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपापले काम प्रामाणिकपणे करावे, असे आयुक्त डॉ. जावळे म्हणाले.

..अन्यथा जप्तीची कारवाई

घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कराची थकबाकी सुमारे 188 कोटी रुपये असून त्यामध्ये 101 कोटींची शास्तीची थकबाकी आहे. शंभर टक्के शास्ती माफीचा लाभ घेत करदात्यांनी 31 ऑगस्टपर्यंत कर भरावा. अन्यथा जप्तीची कार्यवाही केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. जावळे यांनी दिला.

Back to top button