

नगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या 85 गटांसाठी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये काही इच्छुकांच्या गटांत अनुसूचित जाती-जमातींची आरक्षणं पडली, तर कुठे महिला, सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने संबंधितांच्या राजकीय अडचणीत वाढ झाली आहे. यामध्ये माजी पदाधिकारी राजश्रीताई घुुले, प्रतापराव शेळके, सुनील गडाख, मीराताई शेटे, उमेश परहर यांच्यासह राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे आदींना सुरक्षित गट शोधावे लागणार आहेत. तर शालिनीताई विखे, काशीनाथ दाते, शरद नवले आदींचे गट सुरक्षित राहिले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून इच्छुकांनी तयारीला वेग दिला आहे. जुनमध्ये गट-गणांची अंतिम रचना झाल्यानंतर अनेकांना आरक्षण सोडतीचे डोहाळे लागले होते. काल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात 85 गटांचे आरक्षण काढले, तर 170 गणांचे आरक्षण हे 'त्या त्या' तालुक्यात निघाले.
शालिनीताई राधाकृष्ण विखे, काशीनाथ दाते, संदेश कार्ले, मिलींद कानवडे,अजय फटांगरे, कविता लहारे, शरद नवले, संगीता गांगुर्डे, आशाताई दिघे, भाग्यश्री मोकाटे, उज्ज्वला ठुबे, वंदनाताई लोखंडे.
अर्थ समितीचे माजी सभापती सुनील गडाख, जालिंदर वाकचौरे, राजेश परजणे, राहुल राजळे, शरद झोडगे यांच्या गटांवर महिला सर्वसाधारण, ना.मा.प्र महिलांचे आरक्षण पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपल्या सौभाग्यवतींना संधी द्यावी लागणार आहे. तर, काहींना इतर सोयीचा गट शोधून त्या ठिकाणाहून नशीब अजमावे लागणार आहे.
काही गटांत महिलांचे आरक्षण पडल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला. मात्र, या ठिकाणी त्यांनी आता आपल्या सौभाग्यवतींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे ज्या महिला सभागृहात होत्या, त्या ठिकाणी 'सर्वसाधारण' निघाल्याने आता 'पतीराज' मैदानात दिसणार आहेत. यात अर्जून शिरसाठ, बाळासाहेब हराळ यांना संधी आहे. वांबोरीतून शशिकला पाटील यांचे सुपुत्र उदयसिंह सुभाष पाटील आणि अकोलेतून जालिंदर वाकचौरे यांची उच्चशिक्षीत कन्या सायली वाकचौरे निवडणुकीच्या आखाड्यात दिसू शकतात.
अनुराधा नागवडे, सुवर्णा जगताप, पंचशीला गिरमकर, सुनीता खेडकर, ताराबाई पंधरकर यांच्या गटांमध्ये अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे या माजी सदस्या आता कोणत्या गटातून लढणार, याची जनतेतून उत्कंठा वाढली आहे.
जि. प. माजी उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे, समाजकल्याण समितीचे माजी सभापती उमेश परहर, गुलाबराव तनपुरे, धनराज गाडे, माधवराव लामखडे, रमेश देशमुख, भाऊसाहेब कुटे, रोहीणीताई निघुते, सीताराम राऊत, रामहरी कातोरे, सुधाकरराव दंडवते, शाम चंद्रकांत माळी, दादासाहेब शेळके, दत्तात्रय काळे, सुप्रियाताई पाटील, सविता आडसुरे आदींच्या गटांवर वेेगवेगळ्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे जर पुन्हा निवडणूक लढवायचीच असेल, तर त्यांना आता अन्य सुरक्षित गट शोधावा लागणार आहे.
काही महिला माजी सदस्यांचे गट खुले झाल्याने या ठिकाणी आता महिलांनाच कितपत संधी मिळेल, याविषयी साशंकता आहे. मात्र, आपल्या पाच वर्षांच्या विकास कामांच्या जोरावर 'सर्वसाधारण' मधूनही त्यांना पक्षनेतृत्व पुन्हा संधी देऊ शकते. महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मीराताई शेटे यांच्यासह राणीताई लंके, प्रभावती ढाकणे, सुनीता भांगरे, तेजश्री लंघे, संध्या आठरे, सुषमा दराडे, पुष्पा वराळ, शांताबाई खैरे, पुष्पा रोहोम, मंगलताई पवार, नंदाताई गाढे, संगीता दुसुंगे आदी महिला नेतृत्व सभागृहात पुन्हा दिसणार का? याकडे नजरा असणार आहेत.
जि.प. माजी अध्यक्षा राजश्री घुले यांचा दहिगावने हा गट ना.मा.प्र. साठी राखीव आहे. तर , भातकुडगाव आणि मुंगी हे ना.मा.प्र महिलेसाठी राखीव आहेत. त्यामुळे त्यांना ओबीसी कार्डवर लढावे लागणार आहे. मात्र, त्या कोणत्या गटातून लढणार याविषयी उत्कंठा आहे. घुलेंच्या कट्टर विरोधक समजल्या जाणार्या जनशक्तीच्या हर्षदा काकडे यांचीही तोडफोडी आणि नंतर आरक्षणामुळे राजकीय अडचण झाली आहे. त्यांनाही 'ओबीसी' कार्डवर लढावे लागणार आहे. 'भातकुडगाव'मध्ये घुले-काकडे असा सामना पहायला मिळू शकतो, अशीही चर्चा आहे.
झेडपी निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपूत्र अक्षय कर्डिले यांची राजकीय एन्ट्री चर्चेचा विषय ठरली होती. मात्र आरक्षणात त्यांचा हक्काचा नागरदेवळे गट ना.मा.प्र महिलेसाठी राखीव झाला आहे. तर जेऊरही महिलेसाठी गेला आहे. त्यामुळे अक्षय कर्डिले यांना राजकीय प्रवेशासाठी आणखी काही काळ थांबावे लागेल, असे चित्र आहे. मात्र, याचवेळी अक्षय यांच्या सौभाग्यवतींना या ठिकाणी संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे.