

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : कर्जत येथे सद्गुरू गोदड महाराज रथयात्रनिमित्त झालेल्या गर्दीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचून घाण झाली होती. शहरातील सर्वांनी एकत्र येऊन महाश्रमदान करत शहराची स्वच्छता केली.
रथयात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली. पाऊस असूनही सलग दोन दिवस प्रचंड गर्दी होती. खाण्याचे, मनोरंजनाचे अनेक स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामुळे खाद्यपदार्थांची घाण, हार, नारळ, प्लास्टिक, कागद, अशा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण शहरातील मुख्य परिसरात कचरा साचला होता. सर्वांनी एकत्र येत स्वच्छता केली. सर्व सामाजिक संघटनांच्या शिलेदारांनी सकाळी महाश्रमदान स्वच्छता अभियानास सुरुवात केली. यानंतर मुख्याधिकारी गोविंद जाधव, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपंचायतचे सर्व स्वच्छता कर्मचारी, सर्व शाळांचे विद्यार्थी, तसेच अनेक मान्यवर या अभियानात सहभागी झाले. अवघ्या अडीच तासांत कर्जत शहराची संपूर्ण स्वच्छता त्यांनी केली.
यानंतर सर्व विद्यार्थी, स्वच्छतादूत हे कर्जत बसस्थानक परिसरात एकत्र आले. अभियान यशस्वी केल्याबद्दल नगरपंचायतच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पुरी सर यांनी मनोगत व्यक्त केले.
अभियानासाठी मिरजगाव येथून टायगर अकॅडमीचे 150 विद्यार्थी मिरजगाव ते कर्जत असे 25 किलोमीटर अंतर धावत आले. त्यांनी कर्जत शहरात मेन रोड, बाजारतळ व गोदड महाराज मंदिर परिसरात स्वच्छता केली. या अकॅडमीतील शिक्षक व सर्व विद्यार्थी या अभिनव उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.