

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा महिन्यांपासून वेध लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट-गणांची आरक्षण सोडत आज गुरुवार (दि. 28) निघणार आहे. दरम्यान, यामध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांचे आरक्षण आपल्या गट-गणात पडण्याच्या धास्तीने इच्छुकांची धाकधूक चांगलीच वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेचा कार्यकाल 21 मार्च रोजी संपला आहे. त्यानंतर प्रशासकांनी कारभार हाकला. सध्या प्रशासक म्हणून सीईओ आशिष येरेकर हे कारभार पाहत आहेत. तर, दुसरीकडे इच्छुकांच्या निवडणूक आयोगाकडे नजरा लागल्या आहेत.
प्रारंभी पूर्वीच्या 73 गट आणि 146 गणांची मोडतोड करून 12 गट आणि 24 गण वाढविले. गट-गणांची अंतिम रचना प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या. त्यात ओबीसीचा प्रश्नही मार्गी लागला. त्यामुळे या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार असल्याचे अखेर निश्चित झाले. आज जिल्हा परिषदेच्या 85 गटांसाठी जिल्हाधिकारी हे नगर येथे सोडत काढतील, तर पंचायत समितीच्या 170 गणांसाठी त्या-त्या तालुक्यांत तहसीलदारांवर सोडतीची जबाबदारी दिलेेली आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे. आज सकाळी इच्छुकांच्या उपस्थितीत ही सोडत काढली जाणार आहे.
दरम्यान, आरक्षण सोडत निघाल्यानंतर काहींचा हिरमोड होणार, तर काहींना सोयीचे राजकारण ठरणार, त्यामुळे या सोडतीवरच इच्छुकांची पुढील राजकीय वाटचाल ठरणार आहे. काही ठिकाणी आरक्षणामुळे आपली राजकीय गैरसोय झाल्यास सौभाग्यवतींना पुढे करावे लागेल, तर काही ठिकाणी शेजारील सुरक्षित गट-गणांमध्येही दिग्गजांना चाचपणी करावी लागणार आहे.
कसे असेल संभाव्य आरक्षण..
जिल्हा परिषदेच्या 85 गटांपैकी 50 टक्केप्रमाणे 43 जागा ह्या महिलांसाठी असतील. यात, ओबीसींच्या पूर्वीच्या 20 जागांत आणखी किमान 2 ने भर पडून तो आकडा 22 पर्यंत पोहचेल. तर अनुसूचित जाती 11 आणि जमाती 8 गटांची सोडत होणार आहे. या आरक्षित जागांपैकी 50 टक्के जागा त्या-त्या प्रवर्गातील महिलांना असतील. आरक्षण सोडत काढताना लोकसंख्या आणि चक्रीय पद्धतीचा वापर केला जाणार आहे.
आता कोणाला फटका..?
गेल्या पाच वर्षांपूर्वी आरक्षण सोडतीत तत्कालीन अध्यक्षा मंजूषा गुंड, उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, बाबासाहेब दिघे, नंदा वारे, मीरा चकोर या सभापतींच्या गटावर आरक्षण पडले होते. याशिवाय बाळासाहेब हराळ, अॅड. सुभाष पाटील, संभाजी दहातोंडे यांचेही गट आरक्षणाने अडचणीत सापडले होते.
माजी पदाधिकार्यांच्या गटांकडे नजरा
राजश्री घुले (दहिगावने), शालिनीताई विखे (लोणी), मीराताई शेटे (साकूर), अनुराधा नागवडे (बेलवंडी), शशिकला पाटील (वांबोरी), सुनीता भांगरे (राजूर), सुप्रिया झावरे (ढवळपुरी), सुवर्णा जगताप (मांडवगण), राणी लंके (सुपा), प्रभावती ढाकणे (भालगाव), काशीनाथ दाते (टाकळी ढोकेश्वर), सुनील गडाख (शिंगणापूर), प्रताप शेळके (वडगाव गुप्ता), राजेश परजणे (संवत्सर), कैलास वाकचौरे (धामणगाव), शरद नवले (बेलापूर) धनराज गाडे (बारागाव नांदूर) .