नगर : ‘…तर शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवाना उभारू’ | पुढारी

नगर : ‘...तर शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवाना उभारू’

नगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीच्या परवानगीसंदर्भात प्रशासनाकडून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे वारंवार पत्र व्यवहार करण्याबाबत हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप सभापती कुमार वाकळे यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केला. मनपा अधिकार्‍यांकडून पुतळ्यासाठी पाठपुरावा होत नसल्यास आम्ही विनापरवाना पुतळा उभारू, असा इशाराही वाकळे व नगरसेवक गणेश कवडे यांनी दिला.

महापालिकेची स्थायी समितीची सभा आज सभापती कुमार वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नगर सचिव एस. बी. तडवी, स्थायी समिती सदस्य रवींद्र बारस्कर, गणेश कवडे, मुद्दसर शेख, प्रशांत गायकवाड, रूपाली वारे आदी सदस्य उपस्थित होते. मनपाचे सर्व उपायुक्त उपस्थित होते. सभेच्या अजेंड्यावर असलेल्या पुतळा उभारण्याच्या विषयावर सुरूवातीला चर्चा झाली. सभापती वाकळे म्हणाले, की मनपाच्या स्वतःच्या जागेत पुतळा उभारायचा आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दोन सुरक्षा रक्षक आहेत. त्यामुळे परवागी मिळणे अवघड नाही. मात्र, मनपा अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष झाले असून, त्यांची नकारात्मक भूमिका आहे.

दरम्यान, उपायुक्त डांगे म्हणाले, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक होणे आवश्यक आहे. जिल्हा अधिकार्‍यांची तात्पुरत्या स्वरूपात ना हरकत मिळाली पाहिजे. त्यासाठी राजकीय दृष्या पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्यावर सभापती वाकळे यांनी संतप्त होत अधिकार्‍यांनी जबाबदारी झटकू आमच्यावर टाकू नये. ती जबाबदारी अधिकार्‍यांची आहे. आम्ही जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे जाऊन पाठपुरावा करूच. पण मग अधिकारी काय करणार असा सवाल सभापती वाकळे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसंदर्भात उपअभियंता पारखे यांनी सभागृहाला माहिती दिली. त्यांनी पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरवा केल्याचे सांगितले. तर, वास्तु विशारद व कला संचालनालयाकडे कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही. तसेच, मनपाच्या रेकॉडवर काही नाही, असे एका पॅनेलवरील वकिलाने सांगितले. अधिकारी सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप प्रशांत गायकवाड यांनी केला. रवींद्र बारस्कर यांनी चर्चेत सहभाग घेतला. कोरोना प्रतिबंधात्मक योजनेसाठीची निधी मंजुरीसाठी सभागृहात आला नाही, असे सभापती वाकळे यांनी विचारले असता कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी साडेसहा कोटींचा निधी खर्च करण्यात आला. तो मंजुरीसाठी थेट आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना सांगितले.

ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्या उद्घाटन

कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने मनपाने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यात सावेडी कचरा डेपोमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारणीस मंजुरी देण्यात आली होती. त्या प्रकल्पाचे शंभर टक्के काम झाले असून, उद्या त्या प्रकल्पाचे उद्घाटन होत असल्याची माहिती अभियंता गाडळकर यांनी दिली.

कचर्‍याचा प्रश्न गंभीर

शहरात कचरा गोळा करणार्‍या ठेकेदाराची मुदत संपत आली आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून व्यवस्थित कचरा संकलन होत नाही. कचर्‍याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग लागले आहेत. तोच कचरा कुत्रे रस्त्यावर आणीत आहेत. शहरात कचर्‍याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे ठेकेदाराचे कचर्‍याचे वजन काटे तपासण्यात यावेत, अशी मागणी सभापती वाकळे यांनी केली. त्यावर कचरा संकलनाचा नवीन प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे घनकचरा विभागप्रमुख डॉ. शंकर शेडाळे यांनी सांगितले.

सुशोभिकरणाचा प्रस्ताव करा

महापालिकेच्या आवारात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महारजाांच्या पुतळ्याला परवानगी मिळेपर्यंत महापालिकेनेे सुशोभिकरणाचा प्रस्ताव तयार करावा. तो प्रस्ताव सात दिवसांच्या आत तयार करून सादर करावा, अशा सूचना सभापती वाकळे यांनी दिल्या.

Back to top button