राहुरी : आषाढ सरी बरसल्या ! मुळा धरण 75 टक्क्यांकडे

राहुरी : आषाढ सरी बरसल्या !  मुळा धरण 75 टक्क्यांकडे
Published on
Updated on

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर आषाढी सरींची कृपा चांगलीच लाभदायी ठरली. धरणसाठा 75 टक्क्यांच्या समीप पोहोचला आहे. धरणामध्ये 19 हजार 129 दलघफू पाणी साठ्याची नोंद झाली असून, आवक 2 हजार 984 क्यूसेक प्रवाहाने होत होती. मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेले कोतूळ, पांजरे व हरिश्चंद्रगड पट्ट्यात पावसाचा कमी-जास्त वर्षाव सुरूच आहे.

पाणलोटातील बलठण, यसणठाव, आंबीत, कोथळा, शेळवंडी, पिंपळगाव खांडसह छोटी- मोठी धरणे व बंधारे तुडूंब होऊन वाहत आहेत. परिणामी पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी असला, तरीही डोंगर दर्‍यातून झिरपणारे व पावसामुळे धरणाकडे होणारी आवक सुरूच आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजता धरणाचा साठा 18 हजार 770 दलघफू होता. आवक 4 हजार 24 क्यूसेक इतकी होती. दरम्यान, दुपारी 12 वाजता आवक 2 हजार 441 क्यूसेक, तर 3 वाजता 3 हजार 212 क्यूसेक नोंदविण्यात आली. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी 6 वाजता धरण साठा 73 टक्के इतका झालेला आहे.

मुळा धरण बुधवारी (दि.27) 75 टक्के भरणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावरही पावसाचा वर्षाव काहीशा प्रमाणात ओसरला आहे. परंतु, आषाढी सरींच्या वर्षावाने वातावरणातील गारवा टिकलेला आहे. त्यामुळे खरीप पिकांसाठी पोषक वातावरण निर्मिती झाल्याचा आनंद असताना, दुसरीकडे मुळा धरण सलग चौथ्या वर्षी पूर्ण 26 हजार दलघफू क्षमतेने भरण्यासाठी सज्ज झाल्याचे सुखद चित्र आहे. सन 1972 पासून मुळा धरण निर्मिती नंतर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पाणी जमा होण्यास प्रारंभ झाला. धरण निर्मितीपासून धरण 32 वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे 33 व्या वेळी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शाश्वती निर्माण झालेली आहे.

लाखो हेक्टरला संजीवनी देणार्‍या मुळा धरणाचा पाणीसाठ्याचे दुष्काळमुक्तीला मोठे योगदान आहे. धरणाचा पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावर पावसाचा वर्षाव चांगलाच लाभदायी ठरल्याचे समाधान शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसून येत आहे.

..तर मुळाचे दरवाजे जुलैतच उघडणार
मुळा धरणाचा साठा 19 हजार 129 दलघफू (73 टक्के) इतका झाला आहे. 31 जुलैपर्यंत मुळा धरणसाठ्याने 20 हजार दलघफूची पाणी पातळी ओलांडल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याची माहिती शाखा अभियंता शरद कांबळे यांनी दिली आहे. मुळा धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची मोठी पर्वणी पर्यटकांना लाभण्याची दाट शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news