

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणार्या 28 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रशासनाने नव्याने जाहीर केला आहे. या आरक्षण सोडतीसाठी 29 जुलै रोजी गावागावात विशेष ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणही निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या 3 जूनच्या निर्देशांनुसार डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या प्रारुप रचना व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार दि. 21 जून रोजी आरक्षणासहीत अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 20 जुलै रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवण्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे.
त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे, तसेच नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या विचारात घेऊन, त्यानुसार इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात आला आहे. यासाठी 28 गावांमध्ये दि. 29 जुलै रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून, त्यासाठी गावनिहाय अधिकारी-कर्मचार्यांची नियुक्ती तहसीलदार उमेश पाटील यांनी केली आहे.
आरक्षण सोडत होणार्या ग्रामपंचायती व नियुक्त अधिकारी
सारोळा कासार – सी. एस. सोनार (विस्तार अधिकारी, पं. स.), कापूरवाडी – एस. एम. आंबेडकर (शाखा अभियंता, पं. स.), पिंपळगाव कौडा – सचिन चौधरी (विस्तार अधिकारी, पं. स.), दहिगाव – आशाबाई पवार (विस्तार अधिकारी, पं.स.), साकत – रवींद्र कापरे (विस्तार अधिकारी, पं. स.), नागरदेवळे – रामनाथ कराड (विस्तार अधिकारी, पं.स.), आगडगाव – निर्मला साठे (विस्तार अधिकारी, पं.स.), शेंडी – एस. पी. झाडे (मंडल अधिकारी), नांदगाव – डी. ए. जायभाय (मंडल अधिकारी), मदडगाव – बकरे (मंडल अधिकारी), सोनेवाडी (पिंपळगाव लांडगा) – व्ही. एल. गोरे (मंडल अधिकारी), टाकळी खातगाव – वृषाली करोसिया (मंडल अधिकारी), वाळकी – वैशाली साळवे (मंडल अधिकारी), रांजणी – जे. जी. ढसाळ (मंडल अधिकारी), पांगरमल – जे. जी. सुतार (मंडल अधिकारी), उक्कडगाव – श्रीमती व्ही. ए. हिरवे (मंडल अधिकारी), नेप्ती – रुपाली टेमल (मंडल अधिकारी), आठवड – रवींद्र माळी (मंडल कृषी अधिकारी), खातगाव टाकळी – सी. एन. खाडे (विस्तार अधिकारी पं. स.), पिंपळगाव लांडगा – विजयकुमार सोमवंशी (कृषी पर्यवेक्षक), राळेगण म्हसोबा – प्रकाश करपे (कृषी अधिकारी), बाबुर्डी बेंद- शंकर खाडे (कृषी पर्यवेक्षक), सारोळाबद्धी – जालिंदर गांगर्डे (कृषी पर्यवेक्षक), नारायण डोह – दत्तात्रय करंडे (कृषी पर्यवेक्षक), कौडगाव जांब – प्रतिभा राऊळ (कृषी पर्यवेक्षक), जखणगाव – संजय बोरुडे (कृषी पर्यवेक्षक), सोनेवाडी (चास) – दत्तात्रय जावळे (कृषी पर्यवेक्षक), वडगाव तांदळी – ए. ए. बन (तहसील कार्यालय). या सर्व नियुक्त अधिकार्यांना आरक्षण सोडतीबाबत बुधवारी (दि.27) प्रशिक्षण देण्यात येणार आहे.