नगर : यशवंत प्रतिष्ठानतर्फे ज्ञानेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता | पुढारी

नगर : यशवंत प्रतिष्ठानतर्फे ज्ञानेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : नेवाशातील कामिका एकादशीनिमित्ताने मोठी यात्रा भरली होती. सोमवारी युवा नेते उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व ज्ञानेश्वर महाविद्यालयातर्फे ज्ञानेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सहा घंटा गाड्यांच्या 18 खेपा, ट्रॅक्टरच्या चार फेर्‍या कचरा गोळा करण्यात आल्या.

दरवर्षी मोहिम राबविणार : उदयन गडाख

ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. यानंतर ज्ञानेश्वर मंदिर परिसर व संत तुकाराम महाराज मंदिर परिसर, ज्ञानेश्वर मंदिर रस्ता परिसरात यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व ज्ञानेश्वर महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम राबवण्याची संकल्पना युवा नेते उदयन गडाख यांनी मांडली. त्यानुसार ज्ञानेश्वर मंदिर परिसरात सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत नेवासा येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे 100 कार्यकर्ते, ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे 400 विद्यार्थी व त्यांच्यासमवेत युवा नेते उदयन गडाख यांनी सहभागी घेतला आणि स्वच्छता केली. मोठ्या प्रमाणावर असलेल्या प्लास्टिक पिशव्या, फुले व अन्य निर्माल्यांचे व्यवस्थित रित्या संकलन करून परिसराची स्वच्छता केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकही या स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभागी झाले होते.

उदयन गडाख म्हणाले, सर्वांच्या सहकार्‍याने ज्ञानेश्वर मंदिरात स्वच्छता मोहीम राबवता आली. विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन मोठ्या प्रमाणावर स्वच्छता केली. याचा सार्थ अभिमान आहे. दरवर्षी कामिका एकादशीच्या दुसर्‍या दिवशी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यातर्फे ज्ञानेश्वर मंदिर,संत तुकाराम महाराज मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविली जाईल. सर्वांनी सहभागी व्हावे व ज्ञानेश्वर मंदिर व नेवासा शहर परिसर नेहमी स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्नशील रहावे. स्वच्छता यज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन उदयन गडाख यांनी केले.

यावेळी शिवाजी महाराज देशमुख यांनी उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता वारी’ उपक्रमाचे कौतुक केले. युवा नेते उदयन गडाख यांनी तरुणांसह सहभागी होत केलेली स्वच्छता निश्चितच दिशादर्शक आहे. याप्रसंगी नेवासा शहर स्वच्छता करणार्‍या नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी महिलाांचा उदयन गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब वाघ, रामभाऊ जगताप, गफूर बागवान, प्रतीक्षा तुपे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, ज्ञानेश्वर महाविद्यालययाचे विद्यार्थी, प्राध्यापक आदी उपस्थित होते. प्रा.देविदास साळुंके यांनी आभार मानले.

दरवर्षी ज्ञानेश्वर मंदिर परिसरात कामिका एकादशीच्या दुसर्‍या दिवशी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

– उदयन गडाख, युवा नेते.

Back to top button