नगर : केंद्र सरकारने शेतकर्‍यांची थट्टा थांबवावी : किसनराव रासकर | पुढारी

नगर : केंद्र सरकारने शेतकर्‍यांची थट्टा थांबवावी : किसनराव रासकर

जवळा, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या माध्यमातून कारखानदारांनी प्रक्रिया उद्योगातून बनविलेल्या इतर मालाची देशविदेशांतर्गत निर्यात चालू आहे. मग, शेतकर्‍यांनी शेतात पिकविलेल्या कांद्याचीच निर्यात बंद ठेवून, शेतकर्‍यांची चालविलेली थट्टा थांबवावी. नाफेडतर्फे कांदा खरेदी करून शेतकर्‍यांची चोहोबाजूने झालेली आर्थिक कोंडी सरकारने फोडावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर यांनी केली.

काद्यांचे भाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभमीवर पारनेर तालुक्यातील जवळा येथे कांदा उत्पादक शेतकर्‍यांची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यांवेळी त्यांनी ही मागणी केली. सध्या नैसर्गिक आपत्तीने व शेतमालाचे बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकरी चोहोबाजूंनी हैराण होऊन आर्थिक कोंडीत सापडला आहे. कांद्यावर निर्यातबंदी घातलेली असताना दुसरीकडे मात्र केंद्र सरकार इतर देशांना आपला तांदूळ, युरिया आदी गोष्टींची निर्यात करीत आहे. ही बाब जरी इतर देशांशी संबंध जोडण्याच्या दृष्टीने चांगली असली, तरी आपल्या शेतकर्‍यांच्या हिताचाही निर्णय सरकारने घ्यावा व बाजारभाव पडलेल्या कांद्याची नाफेडमार्फत खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा देणे गरजेचे आहे, असेे ते म्हणाले.

कांद्याचे बाजारभाव वाढतील, या आशेवर शेतकर्‍यांनी कांदा साठवून ठेवला. कांदा लागवडीचा नवीन हंगाम जवळ आला असला, तरी अजूनही कांद्याचे बाजारभाव वाढण्याची चिन्हे दिसत नसल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक अण्णासाहेब बढे, सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रदीप सोमवंशी, कचरू बोचरे, ग्रामपंचायत सदस्य नाथा रासकर, संतोष पठारे, सुभाष पठारे, माजी सरपंच रामदास रासकर यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

श्रीलंकेत कांदा 100 रुपये किलो

सध्या श्रीलंकेत कांदा शंभर ते एकशे दहा रुपये किलोने विकला जात आहे. परंतु, व्यापार्‍यांना चलन मिळत नसल्याने त्यांनी खरेदी बंद ठेवली आहे. आपल्याकडे मात्र कांदा दहा ते बारा रुपये किलो अशा मातीमोल भावाने विकला जात आहे. त्यात उत्पादन खर्चही निघत नाही. त्यातच अति पावसाने कांद्यासह अन्य पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी बेजार झाला आहे.

Back to top button