नगर : श्रीरामपुरात डाकसेवकांचे धरणे आंदोलन | पुढारी

नगर : श्रीरामपुरात डाकसेवकांचे धरणे आंदोलन

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या अधिन असलेल्या भारतीय डाक विभागात कार्यरत अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी श्रीरामपूर डाक कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी डाकसेवकांच्या वतीने श्रीरामपूर अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने सातवा वेतन आयोग लागू करताना डाक सेवकांच्या काही मागण्या मान्य केल्या. परंतु कमलेश चंद्रा समितीने केलेल्या शिफारशींप्रमाणे बर्‍याच मागण्या लागू करण्याच्या राहिल्या आहेत. यामध्ये ग्रामीण डाकसेवक यांना खात्यात समाविष्ट करावे, 12:24:36 याप्रमाणे जुन्या कर्मचार्‍यांना पदोन्नती द्यावी, ग्रॅज्युइटी रक्कम पाच लाख मिळावी, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, 180 दिवस रजा रोखीकरण करून रक्कम देण्यात यावी, कमिशन बेसवरील कामाचे मूल्यमापन करून सदर कामकाज वर्कलोडमध्ये धरावे, डाकसेवेचे खासगीकरण करू नये व ते थांबवावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी एम. एम. गडगे, बी. आर. राऊत, ए. डी. पटारे, एन. पी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर पगारे, ज्ञानदेव मोरे, अप्पासाहेब पटारे, बाबासाहेब बनकर, संतोष सोमवंशी, बंडू शिंदे, दिलीप शिंदे, रोहिणी काळे, प्रतीक्षा ओहोळ, गणेश माने, आकाश शिंदे, अमरीन सय्यद आदी उपस्थित होते.

Back to top button