

संगमनेर विशेष, पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांनी आपल्या शेतात पिकविलेला शेतमाल, भाजीपाला जास्त काळ टिकावा, यासाठी लोणीच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शून्य ऊर्जेवर आधारित सहजपणे उपलब्ध होईल, असे साहित्य वापरून शीतकक्ष बनवून रहिमपूर परिसरातील शेतकर्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या लोणी तालुका राहाता येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी ग्रामीण कृषी, जागरूकता कार्यानुभव व औद्योगिकता प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत रहिमपूर तालुका संगमनेर येथील शेतकर्यांना शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष तयार करून दाखवला, तसेच शेतकर्यांच्या शंकेचे निराकरण करून कृषिदूत विशाल हगारे, कुणाल चाटे, शिवम कानवडे, प्रतीक बुर्हाडे, संदेश यादव, रोहित गुळवे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शेतकरी अरुण शिंदे, चंद्रकांत वाळुंज, सुरेश खुळे, हौशिराम गुळवे, भाऊसाहेब शिंदे, सजन शिंदे उपस्थित होते. भाजीपाला व फळे नाशवंत असल्यामुळे आपण ती जास्त काळ साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे या शीतकक्षाचा वापर करून शेतकरी फळे व भाजीपाला काही काळासाठी साठवण करू शकतात. फळे, भाजीपाला व इतर नाशवंत पदार्थांची नासाडी टाळता येईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी या विद्यार्थ्यांना लोकनेते, डॉ. बाळासाहेब विखे पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. साळोखे, प्रा. अमोल खडके, प्रा. रमेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.