

नगर : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातून चोरी केलेल्या दोन रिक्षा नगरमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या रिक्षाचोराच्या मुसक्या कोतवाली पोलिसांनी आवळल्या आहेत. साडेचार लाख रूपये किंमतीच्या चोरलेल्या दोन रिक्षांसह आरोपी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी (दि.23) सकाळी ही कारवाई केली.
सोन्या ऊर्फ सूरज शिवाजी शिंदे (वय 28, रा. बुरूडगावरोड, नगर) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील नालेगाव अमरधाम मागील बाजूस एकजण दोन चोरीच्या रिक्षा विक्री करण्यासाठी घेऊन आल्याची माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना खबर्याकडून मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला आदेश दिलेे.
पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपीला दोन रिक्षांसह ताब्यात घेतले व कागदपत्रांविषयी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाचे चेसी नंबर व इंजिन नंबरवरुन माहिती काढून एमआयडीसी भोसरी पोलिस, पिंपरी चिंचवड व चिखली पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर रिक्षा चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले.
कोतवाली पोलिसांनी आरोपी व जप्त केलेल्या रिक्षा पुढील कारवाईसाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिल्या. ही कारवाई पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद गायकवाड, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, अमोल गाडे, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, तान्हाजी पवार, हेमंत थोरात, अभय कदम, अतुल काजळे, सतीश भांड, प्रशांत बोरुडे आदींच्या पथकाने केली.