श्रीरामपूर: …अखेर कोरोना मृतांची नोंद, ‘मिशन वात्सल्य’चे प्रयत्न यशस्वी | पुढारी

श्रीरामपूर: ...अखेर कोरोना मृतांची नोंद, ‘मिशन वात्सल्य’चे प्रयत्न यशस्वी

श्रीरामपूर: पुढारी वृत्तसेवा : तालुका मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीत सातत्याने चर्चा झाल्यानंतर श्रीरामपूर नगरपालिकेत अखेर कोरोना मृतांची नोंदणी सुरू झाल्याची माहिती समितीचे अशासकीय सदस्य तथा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे श्रीरामपूर तालुका समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी दिली.

श्रीरामपुरातील अनेकांचा कोरोनावर उपचार घेताना शहराबाहेर विविध ठिकाणी मृत्यू झाले. अशा मृतांची आकडेवारी व माहिती श्रीरामपूर नगरपालिकेत उपलब्ध नसल्यामुळे 50 हजार रुपयांचे कोरोना सानुग्रह अनुदान, बालसंगोपन योजना, संजय गांधी निराधार आदी योजनांच्या लाभांपासून श्रीरामपुरातील अनेक कोरोना मृतांचे वारस, एकल (विधवा) पत्नी, आई, वडील गमावल्यामुळे एकल अथवा अनाथ झालेली बालके विविध सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित राहत आहेत.

यासाठी नगरपालिकेने घरोघर सर्वेक्षण करून, नगरपालिका हद्दीबाहेर विविध ठिकाणी कोरोनामुळे मृत झालेल्या मृतांची आकडेवारी व सविस्तर माहिती संकलित करावी, अशी मागणी सातत्याने साळवे यांनी मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीत लावून धरली होती, मात्र समितीचे सदस्य मुख्याधिकारी गणेश शिंदे समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसल्यामुळे शहरातील कोरोना मृतांच्या आकडेवारीचा प्रश्न सुटला नव्हता.

समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार प्रशांत पाटील, अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय आरणे यांना नगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना मृतांची आकडेवारी संकलित करण्यासाठी काही सूचना व उपाययोजना सुचविल्या होत्या. त्याची दखल घेत मुख्याधिकारी शिंदे यांच्याशी चर्चा करून आरणे, ‘दीनदयाल अंत्योदय योजने’चे समूह संघटक हरीश पैठणे यांनी पालिकेत घरातील कोरोना मृतांची नोंदणी सुरू केली आहे.

नगरपालिका हद्दीतील ज्या व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झाले आहे, अशा कुटुंबातील एकल महिलांसह पाल्यांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी अशा कुटुंबांची माहिती संकलित करण्याचा निर्णय श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

त्यानुसार पालिका हद्दीतील कोरोना मृतांच्या वारसांसह एकल विधवा महिलांनी कुटुंबातील कोरोना मृतांची नावे व इतर माहिती नगरपालिकेतील दीनदयाल अंत्योदय योजनेचे हरिष पैठणे यांच्याकडे कार्यालयीन वेळेत 29 जुलैपर्यंत सादर करावी, असे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, अर्जुन राऊत, मनिषा कोकाटे, सदस्य सचिव शोभा शिंदे आदींनी केले आहे.

Back to top button