नगर : …अखेर कमालपूर बंधार्‍याचे काम झाले सुरू | पुढारी

नगर : ...अखेर कमालपूर बंधार्‍याचे काम झाले सुरू

माळवाडगाव : पुढारी वृत्तसेवा : गोदावरीवरील कमालपूर बंधारा दुरूस्तीसाठी वैजापूर गंगाथडीच्या ग्रामस्थांनी लोकवर्गणी करण्याची आवश्यकता नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने बंधारा दुरूस्ती करणे हे माझे कर्तव्य आहे. आपण तातडीने माझ्यावतीने नारळ फोडून काम सुरू करा. संपूर्ण दुरुस्ती खर्च निधी ताबडतोब उपलब्ध करून देतो, असा संदेश आ. रमेश बोरनारे यांनी बाजाठाण, देवगाव (शनी) ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना दिल्याने कमालपूर बंधारा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले आहे.

वैजापूर-श्रीरामपूर तालुका हद्दीवरील कमालपूर बंधारा वैजापूर तालुक्यातील बाजाठाण, अवलगाव, देवगाव (शनी) चेंडुफळसह गंगापूर तालुक्यातील नेवरगाव, वाहेगाव मांजरी आदी गंगाथडीच्या गावांचा 35 कि. मी. वैजापूरशी तहसील, पंचायत समितीसह प्रशासकिय कामापुरता संंपर्क येतो. कमालपूर बंधार्‍यावरून श्रीरामपूर अवघे 20 कि. मी. अंतर असल्याने कांदा मार्केट, दूध, रुग्णालय, शिक्षक अन् विद्यार्थी वर्दळ हे दैनंदिन दळणवळण ठप्प झाले होते.

बंधारा पाण्यात बुडून पाणी ओसरल्यावर दोन्ही बाजुंचे भरावा तुटल्याने दुचाकीच नव्हे तर पायी मार्गक्रमण करणेही अवघड झाले होते. या परिसरातील जि. प. गटाचे सदस्य शिक्षण आरोग्य कमिटी सभापती अविनाश गलांडे यांनी तातडीने जेसीबी उपलब्ध करून दिला होता. मुरूम व दगड वाहतूक खर्च खुप मोठा असल्याने लोकवर्गणीसाठी ग्रामस्थ पुढे येईना. दरम्यान, वैजापूरचे आ. रमेश बोरनारे यांनी या कामात तातडीने लक्ष घालून ग्रामस्थ कार्यकर्त्यांशी चर्चा करून, ‘माझ्या वतीने आपणच नारळ फोडून ताबडतोब काम सुरू करा,’ असे आदेश दिले.

याप्रसंगी सोमनाथ भराडे, मदन पवार ,अशोक गायके ज्ञानेश्वर भराडे, संतोष चौधरी,गणेश भराडी, राजू जाधव, विशाल खरोशे, सचिन चौधरी, भागिनाथ वालतुरे, दादासाहेब भराडे, दादा पा. तोडमल, प्रवीण मेघळे आदी उपस्थित होते.

बंधारा दुरुस्ती कामावरून श्रेयवाद
वैजापूरचे शिवसेना आ.रमेश बोरनारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबर गेले तर त्यांचे विश्वासु सहकारी जि. प. सदस्य, आरोग्य शिक्षण कमिटी सभापती अविनाश गलांडे ठाकरे गटातच राहिले. आमदार सुरत, गुवाहाटी, गोवा सफर करीत असतानाच दोघांत आरोप- प्रत्यारोपाचे सोशल वार सुरू झाले होते. कमालपूर बंधारा दुरुस्तीत दरवर्षी गलांडे लक्ष घालत असल्याने आमदार निश्चिंत राहत असे. यावर्षी गलांडे यांनी नेहमीप्रमाणे मशिन पाठविले. त्यापाठोपाठ आ. बोरनारेंकडे समर्थकांनी मागणी केली. त्यांनी, ‘लोकवर्गणी करू नका, काम सुरू करा. संपूर्ण खर्च निधी देतो,’ असे सांगितले. यानंतर या कामास सुरूवात झाली. त्यामुळे या कामाच्या श्रेयवादावरून सोशमिडीयावर बाजाठाण, देवगाव, चेंडुफळ येथील दोन्ही समर्थकांत संघर्ष सुरू झाला आहे.

Back to top button