नगर : चौघांची लुटारू टोळी पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

नगर : चौघांची लुटारू टोळी पोलिसांच्या जाळ्यात

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर- पुणे महामार्गावर वाहनचालकांना अडवून चाकूचा धाक दाखवत लुटमार करणार्‍या चौघांच्या टोळीला नगर तालुका पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि.20) पहाटे चास शिवारात सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून लुटीतील दोन मोबाईल, लोखंडी सुरा, 27 हजार 500 रुपयांची रोकड व एक होंडा सिडी डिलक्स मोटारसायकल हस्तगत केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. तर, यातील दोघे अल्पवयीन मुले असल्याने त्यांना बालगृहात पाठविले आहे.

या टोळीतील आकाश सुभाष सोलाट (वय 22) व अक्षय राजू साळवे (वय 24 ), तसेच दोन अल्पवयीन (सर्व रा.सारोळा कासार, ता.नगर) यांचा समावेश आहे. नगर – पुणे महामार्गावर चास-कामरगाव शिवारात नेहमीच रात्री वाहनचालकांना लुटण्याच्या घटना होत असत. या लुटारुंच्या टोळीला पकडण्यासाठी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी खबर्‍यांना अलर्ट केले होते.

बुधवारी (दि.20) पहाटे एक टोळी चास शिवारात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्ष सानप यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकासह जावून सापळा लावला. थोड्याच वेळात चौघे संशयास्पदरित्या मोटारसायकलवर जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवून विचारपूस केली असता, त्यांनी थोड्या वेळापूर्वीच एका ट्रक चालकाला लुटल्याची कबुली दिली. तसेच, 16 जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास चास शिवारातच पिक-अप चालक लक्ष्मण रसाळ (रा. हडपसर, पुणे) यास धमकावत त्यांच्याजवळील 30 हजारांची रोकड व दोन मोबाईल लुटले होते. तो गुन्हाही आम्हीच केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी लुटीतील दोन मोबाईल, लोखंडी सुरा व 27 हजार 500 रुपयांची रोकड, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली होंडा सिडी डिलक्स मोटारसायकल हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधिकारी सानप यांनी दिली.

ही कारवाई नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलिस कर्मचारी काळे, इथापे, योगेश ठाणगे, राहुल शिंदे, आर. एस. खेडकर, थोरात, महिला पोलिस ना.धनवडे आदींच्या पथकाने केली.

Back to top button