...अन् कर्जत शहरात अवतरले संत..! | पुढारी

...अन् कर्जत शहरात अवतरले संत..!

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या कर्जत शहरामध्ये ग्रामदैवत संत गोदड महाराजांची रविवारी रथयात्रा आहे. साक्षात पांडुरंगाचे स्वागत संत गोदड महाराजांनी केले, अशी आख्यायिका आहे. असा हा भव्यदिव्य सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. याला लाखो भाविक कर्जत शहरात येतात. या यात्रेनिमित्त कर्जत शहरांमध्ये सर्व संत साक्षात पांडुरंगाच्या स्वागतासाठी अवतरले…

कर्जत शहराच्या मुख्य रस्त्यांवर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत गोराकुंभार, संत जनाबाई, संत रोहिदास, संत सेना महाराज, संत नरहरी सोनार, संत सावता माळी, संत निवृत्तीनाथ महाराज, या सर्व संतांचे भव्य असे कटआऊट लावण्यात आले आहेत. ही सर्व चित्रे पाहिल्यावर कर्जत शहरांमध्ये या थोर संताचे आगमन झाले असल्याचे दिसून येते.

आमदार रोहित पवारांच्या पुढाकारामधून ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे. रथयात्रेची अतिशय भव्य आणि जोरदार तयारी शहरांमध्ये सुरू असून, यावर्षी विक्रमी भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. येणार्‍या सर्व भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, अशा सक्त सूचना आमदार पवार यांनी सर्व विभागाच्या अधिकार्‍यांना नियोजन बैठकीमध्ये दिले आहेत. त्यानुसार सर्व विभाग या यात्रेच्या तयारीसाठी लागले आहेत.

Back to top button