नगर : सख्खा भाऊ झाला पक्का वैरी!; चौकात झळकवला फलक!! | पुढारी

नगर : सख्खा भाऊ झाला पक्का वैरी!; चौकात झळकवला फलक!!

शेवगाव, रमेश चौधरी : घरातील सख्ख्या भावांची भाऊबंदकी आता गावच्या वेशीवर टांगली गेली असून, सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचे दिसून येत आहे. भावाला वैतागून शेती विकण्याची वेळ दुसर्‍या भावावर आली आहे. यासंदर्भात चक्क त्याने शहर टाकळी गावातील चौकात फलक लावला असून, त्यावर ‘सख्खा भाऊ पक्का वैरी, वावर विकणे आहे,’ असा मजकूर लिहिला आहे. यामुळे फलक तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

पूर्वीच्या काळी तुझा हा भेदभाव नव्हता, भावाभावाच्या वाटण्या झाल्या, तरी त्या हसत खेळत होत. दोन भिंती जरी थाटल्या, तरी अंगण एक रहात आणि एकमेकांना मदत करण्याची भावना असत. आधुनिक युगाला सुरुवात झाली, तांत्रिक युगाने एकोप्याची वाताहात केली. नियत बदलल्याने ज्याच्या हातात ससा तोच पारधी झाला. हळूहळू घर-घरांचे वासे फिरले, मान पान तुटला, स्वार्थीपणा सुरू झाला. चुटकीसरसी वडिलोपार्जीत कमाईच्या वाटण्या सुरू झाल्या. खांद्याचा वाद बांदावर आला आणि यातून नात्यागोत्याचा विसर पडला. त्यात गावागावात वाद पेटवणारे तयार झाले ‘ध’चा ‘मा’ सांगून भावाभावांची नाळ तोडली. शेजारी-शेजारी राहणारे सख्खे भाऊ पक्के वैरी झाले. जमिनीचा तुकडा विकिन; पण तुझी जिरविल, असा वैरपणा काही समाजात चालू झाला.

तो फलक बोध देणारा…

अशाच प्रकारे आपण काय करतोय याचे भान हरपल्याने भर चौकात फलक लावून आपणच आपली वेशीला टांगतो हा तालुक्यात शहर टाकळी येथे झळकत असलेला फलक बोध देणारा आणि घेणाराही ठरत आहे. मात्र, असे शेवटच्या थराला जाण्याचा निर्णय अन्यायाची परिसीमा होत असल्याने घेतला जातो असे काहींचे मत आहे. यात समजदार चार चौघांनी समज घालण्याचे काम केल्यास चिघळणारा वाद मिटू शकतो हे नक्की; पण अशा प्रवृत्ती फार थोड्या असतील याचाही विचार येणे साहजिक आहे.

फुटभर बांधावरून वाद…

प्रत्येक गावात नव्हे, तर अनेक घरात केवळ वाटण्यावरून आणि बांधावरून शेवटच्या थराला जाणारे वाद काही समाजात दिसून येतात. त्यांच्या अंगी स्वार्थी आणि मोठेपणा संचारला. ‘मी’ पणाचा अंहकार त्यांच्यात संचारल्याने माघार कोण घेणार, असा खरा प्रश्न निर्माण झाल्याने भाऊबंदकीचे वाद विकोपाला जाताना दिसू लागले, तर ठरावीक समाज आजही आपलेपणा जपणारा आहे. त्यांचे वाद होतात; पण चार भिंतीच्या आत मिटतातही चार भिंतीच्या आत. यामुळे आजही ते प्रगतीच्या दिशेने आहेत. मात्र, फुटभर बांधावरून वादात अडकलेला काही समाज भिकेला लागला, तरी त्याला समज येत नाही हा एक शापच म्हणावा लागेल.

Back to top button