नगर : आयुक्तांकडून अधिकार्‍यांची झाडाझडती | पुढारी

नगर : आयुक्तांकडून अधिकार्‍यांची झाडाझडती

नगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सोमवारी मनपाच्या सर्वच विभागांची आढावा बैठक घेऊन झाडाझडती घेतली. उपनगरातील अतिक्रमणे किती, मनपाचे गाळे किती, कोर्ट विभागाकडे प्रलंबित प्रकरणे किती, याची चौकशी करून अधिकार्‍यांना विचारणा केली. सर्व विभागांचा आढावा घेऊन तीन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त डॉ. श्रीनिवास कुरे, यशवंत डांगे, मुख्यलेखाधिकारी शैलेश मोरे, मुख्यलेखा परीक्षक विशाल पवार, सहाय्यक आयुक्त सचिन राऊत, सहाय्यक संचालक नगररचना राम चारठाणकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, शहर अभियंता सुरेश इथापे, जलअभियंता परिमल निकम, नगरसचिव एस. बी. तडवी, पाणीपुरवठा व अतिक्रमण विभाग प्रमुख रोहिदास सातपुते आदींसह सर्वच विभागप्रमुख उपस्थित होतेे.

आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शहरात मुख्य बाजारपेठसह उपनगरात रस्त्यावरील किती अतिक्रमणे आहेत. त्यांची यादी दोन दिवसांत सादर करण्याच्या सूचना केल्या. शहरातील मनपाचे किती गाळे आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, करार कधी संपले याबाबत माहिती घेतली. कोर्ट विभागाकडे किती प्रकरणे प्रलंबित आहेत, किती प्रकरणांचा निकाल मनपाच्या बाजूने लागला, किती नाही, त्याची कारणे तीन दिवसांत सादर करण्यास सांगितले. शहरात विजेचे खांब किती आहेत, किती ठिकाणी पथदिवे चालू आहेत, ज्याठिकाणी बंद आहेत त्याची कारणे व कार्यवाहीबाबत अहवाल मागितले. सर्व अधिकारी यांनी तीन दिवसांत सर्व अहवाल सादर करण्याच्या सूचाना दिल्या आहेत.

धाळेधारकांना नोटिसा बजवा

नगरसचिव विभागाकडे किती विषय प्रलंबित आहेत. बांधकाम विभागाने किती वर्कऑर्डर काढल्या, त्याची मुदत, प्रलंबित राहण्याची कारणे याबाबत अहवाल सादर करा. घनकचरा विभागाने पुढील टेंडरची कार्यवाही सुरू करावी, करवसुली महत्त्वाची असून गाळेधारकांना त्वरित नोटिसा बजावण्यात याव्यात, अशा सूचना आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिल्या.

बायोमेट्रिक हजेरी सुरू करा

मनपा कर्मचार्‍यांनी वेळेत कार्यालयात हजर रहावे, बायोमेट्रिक हजेरी सुरू करून प्रत्येक कार्यालयात सी.सी.टी.व्ही. बसवा. कर्मचारी गैरहजर असल्यास विभाग प्रमुखांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त डॉ. जावळे यांनी दिला.

Back to top button