नगर : खंडोबानरची अतिक्रमणे न काढल्यास उपोषण | पुढारी

नगर : खंडोबानरची अतिक्रमणे न काढल्यास उपोषण

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कोरडगाव येथील खंडोबानगरमधील महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील अतिक्रमण प्रशासनाने त्वरित काढावे. अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

यासंदर्भात खंडोबानगर येथील ग्रामस्थांनी पाथर्डीचे नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांना निवेदन दिले आहे. यावेळी प्रवीण जाधव, शब्बीर शेख, खलील शेख, गणेश मस्के, सोमनाथ ससाने, राजू राठोड, अनिल दहिफळे, विकास गोरे, कृष्णा फुंदे, अनिल जाधव, नितीन मासाळ, कृष्णा गायकवाड उपस्थित होते. कोरडगाव येथे मोठी बाजारपेठ आहे. येथील महाराष्ट्र शासनाच्या जागेवर गावगुंडांनी अतिक्रमण केले आहे. ते तेथील रहिवाशांना जीवे मारण्याची तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देतात.

अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याचा रस्ता बंद झाला आहे. अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नाही. प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात येऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने 22 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button