नगर : म्हैसगाव सोसायटीचे 95 सभासद अपात्र | पुढारी

नगर : म्हैसगाव सोसायटीचे 95 सभासद अपात्र

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील सभासदांच्या नावे गुंठाभर जमीन नसतानाही सोसायटीचे सभासद झाले होते, मात्र राहुरीच्या सहाय्यक निबंधकांच्या कायदेशीर प्रक्रियेने 95 बेकायदेशीर सभासद अपात्र ठरले असून, दैनिक ‘पुढारी’च्या चार महिन्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. म्हैसगाव सोसायटी पाठोपाठ आता कानडगावसह तिळापूर सोसायटीही रडारवर असल्याचे चित्र दिसत आहे.

पुढारीने फोडली वाचा

दि. 11 एप्रिल रोजी ‘नावावर गुंठा नसतानाही सोसायटीचे सभासद’ व 16 जून रोजी ‘सोसायटीचे सभासदत्व रद्द होण्याचा मार्ग मोकळा?’ या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
बेकायदेशीर सभासदांचे वृत्त प्रकाशित होताच, गेल्या चार महिन्यांपूर्वी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे म्हैसगाव सोसायटीच्या 128 बेकायदेशीर सभासदांचे सभासदत्व रद्द होण्यासाठी नागरिकांनी तक्रार अर्ज दाखल केला. या तक्रारीनुसार मतदार यादीतील जवळपास 128 सभासदांकडे 10 आर क्षेत्र नसल्याचे समोर आले होते.

तरीही सदर सभासद हे सोसायटीचे बेकायदेशीर सभासद झालेले होते. त्यांची नावे मतदार यादीत आलेले होते. त्यामुळे सदर सभासद हे बेकायदेशीर असून कायद्यास धरून नाही. त्यामुळे ते रद्द होण्यास पात्र होऊ शकतात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 11 व 25 मधील तरतूदीस अनुसरून कार्यवाही करून यादीतील नमुद 10 गुंठे शेतजमीन नसलेल्या सभासदांचे सभासदत्व रद्द होईल का? याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

सहाय्यक निबंधांच्या सनावणीला अनेक गैरहजर

त्यांनतर सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनी दिनांक 19 मे, 26 मे, 15 जून, 21 जून, 4 जुलै व 7 जुलै 2022 रोजी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बेकायदेशीर सभासदांच्या सुनावण्या ठेवल्या होत्या. यावेळी असंख्य सभासद उपस्थित राहिले होते, तर बहुतांशी सभासद अनुपस्थित होते. त्यांनतर दि. 1 जून रोजी सभासदांसाठी वृत्तपत्रात नोटीस देण्यात आली होती. सदर नोटिसामध्ये नमूद केले होते की, सभासदांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी आवश्यक त्या पुराव्यासह सुनावणीला उपस्थित रहावे. उपस्थित न राहिल्यास काहीही म्हणने नाही, असे समजून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या तरतुदीनुसार आपले सभासदत्व रद्द करण्याबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

सदर आदेशाला आधीन राहून दि. 7 जुलै रोजी म्हैसगाव सोसायटीचे 95 बेकायदेशीर सभासद अपात्र झाले. 30 सभासदांकडे कर्ज असल्याने त्यांच्यावर सध्या निर्णय घेतला नसल्याने कर्ज वसुली झाल्यानंतर ते सभासद पात्र की अपात्र ठरविण्यात येणार आहे. तर तीन सभासदांकडे जमिनी असल्याचा पुरावा आढळल्याने ते पात्र झाले आहेत. आता म्हैसगाव सोसायटी पाठोपाठ आरडगाव व तिळापूर सोसायटीमधील बेकायदेशीर सभासदांना चाप बसणार आहे. त्यामुळे दोन्हीही गावातील बेकायदेशीर सोसायटी सभासदांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘दैनिक पुढारी’वर कौतुकाचा वर्षाव

‘दै. पुढारी’ने गेल्या चार महिन्यांपासून याप्रश्नी पाठपुरावा केला. त्यामुळेच सहाय्यक निबंधक प्रशासनाने दै. पुढारीच्या वृत्ताची दखल घेतली. संबंधित सोसायटीतील बेकायदेशीर सभासदांना ‘लगाम’ बसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक नागरिकांनी ‘दैनिक पुढारी’च्या पाठपुराव्याचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Back to top button