नगर : वाहून गेलेल्या तिसर्‍या पर्यटकाचा मृतदेह सापडला | पुढारी

नगर : वाहून गेलेल्या तिसर्‍या पर्यटकाचा मृतदेह सापडला

अकोले, पुढारी वृत्तसेवा : भंडारदरा परिसरात गुगल मॅपचा आधार घेत गेलेल्या औरंगाबादच्या दोन मित्राचा कृष्णावंती नदीमध्ये कार बुडून शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्यात वाहून गेलेल्या नाशिकच्या तुकाराम रामदास चांगटे (वय 72) यांचा मृतदेह सुमारे 31 तासानंतर वाकी परिसरात पोलिसांना आढळून आला आहे.

अकोले तालुक्यातील मुळा-प्रवरा पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने, भंडारदरा येथे निसर्ग बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. औरंगाबाद परिसरातील अ‍ॅड.आशिष प्रभाकर पालोदकर व रमाकांत प्रभाकर देशमुख हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गुगल मॅपचा आधार घेत कारमधून भंडारदर्‍याकडे जात होते. वारंघुशी फाट्याजवळ वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची कार कृष्णवंती नदी पात्रात पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण बचावला होता. तसेच, शुक्रवारी भंडारदरा धरण बघून नाशिकचे पर्यटक घरी जात असताना याच अपघातस्थळी मदतीसाठी थांबले होते. यावेळी कृष्णावंती नदीपात्रात पडलेले नाशिकचे तुकाराम रामदास चांगटे वाहून गेले होते.

राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पो.कॉ.दिलीप डगळे, अशोक गाडे, अशोक काळे, विजय फटागडे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शुक्रवारी रात्रीपासून त्यांचा शोध सुरू ठेवला. रविवारी (दि.17) सकाळी सहा वाजता वाकी परिसरात नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास स.पो.नि. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ. दिलीप डगळे करीत आहेत.

Back to top button