राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठवड्यापासून सुरू असलेला आषाढी सरींचा वर्षाव काहीशा प्रमाणात ओसरला आहे. परिणामी आवकेत घट झाली असताना पाणी साठ्यात कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. मुळा धरण पाणलोट क्षेत्रावर गेल्या आठवड्यापासून आषाढी सरींचा झंझावत पाहावयास मिळाला.
परिणामी धरण साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होऊन धरणाच्या दरवाजापर्यंत पाणी पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून 15ते 20 हजार क्यूसेक प्रवाहाने नवीन पाणी जमा होत होते. परिणामी शुक्रवारी दिवसभरात 1 हजार दलघफू नवीन पाणी धरणात जमा झाले. धरण साठा 14 हजार 435 दलघफू अशी नोंद झालेली आहे.
पावसाचा जोर ओसरल्यानंतर आवकेत घट होऊन आज (शनिवारी) सायंकाळी 6 वाजता 6 हजार 592 क्यूसेकने नवीन पाणी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये जमा होत होते. दरम्यान, आषाढ सरींनी उघडीप घेतल्याने पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक काहीशी कमी होत आहे.