राहुरी : बालकाच्या अपहरणाचा कट फसला | पुढारी

राहुरी : बालकाच्या अपहरणाचा कट फसला

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : गुन्हेगारीबाबत नेहमीच चर्चेत राहणार्‍या बारागाव नांदूर गावामध्ये पुन्हा एकदा एका तब्बल तिसर्‍यांदा चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. अपहरण होताना घाबरलेल्या मुलाने मोठ्याने आवाज केल्याने अपहरणकर्त्यांनी धूम ठोकली. दरम्यान, पोलिसांकडे याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे मंडलिक आखाडा हद्दीमध्ये अनुराधा मंडलिक यांच्या मालकीचे गुर्‍हाळ आहे. गुर्‍हाळात काही परप्रांतीय मजूर काम करतात. पप्पू कश्यप नामक मजुराची मुले शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास खेळत होती. त्यामध्ये दोन मोठी व एक लहान मुलगा होता. खेळल्यानंतर ते गुर्‍हाळाकडे वस्तीकडे निघाले.

दरम्यान, ते घरी जात असतानाच तोंडाला रूमाल बांधून आलेल्या तीन ते चार जणांनी पाठीमागे असलेल्या चिमुरड्या क्रिशला उचलले. त्याने आरडाओरडा करताच सोबतच्या दोन मुलांनी जोरात आरोळी दिली. काहीजण त्या मुलांकडे येत असल्याचे पाहता रूमाल बांधलेल्या अपहरणकर्त्यांनी त्या लहान मुलाला सोडून देत लगतच्या उसामध्ये पळ काढला.

या घटनेची माहिती समजताच गावातील शेकडो तरूण गुर्‍हाळ परिसरात दाखल झाले. त्यांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. परंतु, कधीच वेळेवर न पोहोचणार्‍या पोलिसांनी सातत्य राखत उशिरा घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांशी केवळ चर्चा करून पोलिसांनी टेहाळणी पूर्ण केली. या घटनेबाबत राहुरी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल करण्याची तसदी घेतली नाही.

बारागाव नांदूर परिसरात यापूर्वी अशाच प्रकारे दोन घटना घडलेल्या आहेत. शाळेत जाणार्‍या मुलीचे अपहरणाचा प्रयत्न, तर रात्री मुख्य चौकातून एका चार वर्षीय चिमुरडीला लगतच्या उसाकडे ओढून नेल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच घडला होता. त्या प्रकरणाचा कोणताही छडा लागला नसताना पुन्हा तिसरी अपहरणाची घटना घडलेली आहे.

गावामध्ये काही दिवसांपासून टवाळखोरांचे टोळके सक्रिय झालेले आहे. काही जण बाहेरून गावात आल्याची चर्चाही आहे. अनेक जण दुचाकी चोरी गेल्याचे सांगत आम्हाला दुचाकी शोधण्यासाठी बारागाव नांदूर गावाचा पत्ता दिल्याचे सांगत अनेक जण दाखल होतात. त्यामुळे बारागाव नांदूर गावाशी दुचाकी चोरट्यांचे नेमके कनेक्शन काय? याबाबतही पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Back to top button