श्रीगोंदा : भीमा : 51 हजार क्यूसेक विसर्ग | पुढारी

श्रीगोंदा : भीमा : 51 हजार क्यूसेक विसर्ग

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाच धरणातून भीमा नदीला 51 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, हा विसर्ग चोवीस तासांपूर्वी 73 हजार इतका होता. पुल पाण्याखाली गेल्याने आर्वी बेटाशी संपर्क तुटला आहे. श्रीगोंदा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

तर, दुसरीकडे पुणे जिल्ह्यात विशेषतः पाणलोट क्षेत्रात गेला आठवडाभर जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्यात आले आहे. चोवीस तासांपूर्वी भीमा नदीतून 73 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने शुक्रवारी (दि.15) पाण्याचा विसर्ग 51 हजार क्यूसेक इतका कमी झाला आहे.

पूरपरिस्थिती लक्षात घेता प्रांताधिकारी डॉ. सुधाकर भोसले, तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह आर्वी बेटाला भेट दिली. पाण्याचा विसर्ग जास्त असल्याने आर्वी बेटाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला होता. पथकाने बोटीने जाऊन आर्वी बेटावरील ग्रामस्थांशी संवाद साधला. आरोग्य विभागाच्या पथकाने आवश्यक त्या गोळ्यांचे वाटप केले.

प्रांताधिकारी डॉ. सुधाकर भोसले यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने अत्याधुनिक बोट उपलब्ध करून दिली असून, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास संपर्काची अडचण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button