कोपरगाव : गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडा : स्नेहलता कोल्हे | पुढारी

कोपरगाव : गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडा : स्नेहलता कोल्हे

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवडाभरापासून नाशिक कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दारणा, गंगापूर धरण भरण्याच्या मार्गावर आहेत. गोदावरी नदीला नांदूर- मध्यमेश्वर बंधार्‍यातुन शुक्रवारी सुमारे 37 हजार क्सुसेेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. मात्र, अद्याप गोदावरी कालवे कोरडठाक आहेत.

या पार्श्वभूमीवर या भागात भूगर्भातील पाणीपातळी वाढावी, यासाठी गोदावरी उजवा व डावा कालव्यांना तत्काळ ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे केली आहे. दरम्यान, स्नेहलता कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना या आशयाचे निवेदन पाठविले आहे.

स्नेहलता कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे, कोपरगाव तालुका कार्यक्षेत्रात यंदा पाऊस उशिरा झाला. तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी पाऊस पडला. 11 जुलै रोजी 79 हजार, 12 जुलै रोजी 72 हजार 717, 13 जुलै रोजी 65 हजार 272, 14 जुलै रोजी 58 हजार, तर 15 जुलै रोजी 37 हजार 445 क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे.

बारमाही गोदावरी कालवे लाभक्षेत्र विस्तीर्ण आहे. येथील शेतीला दुग्धोत्पादनाचा जोड धंदा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांकडे पशुधन आहे. काही भागात पेरण्या उशिरा सुरू झाल्या. पशुधन जगविण्यासाठी हिरव्या चार्‍याची आवश्यकता आहे. यासाठी गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडल्यास त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे या भागात पाणीपातळी देखील वाढेल.

ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी कालव्यांना सोडून या भागात शेततळी, दगडी साठवण बंधारे, पाझर तलाव भरून द्यावे. त्याचा जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होईल, असे स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या मागणीचा विचार व्हावा, असेही त्या म्हणतात.

Back to top button