नगर : कुकडी नदीत मोठा विसर्ग | पुढारी

नगर : कुकडी नदीत मोठा विसर्ग

निघोज, पुढारी वृत्तसेवा : कुकडी प्रकल्प धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस पडत असून, चिल्हेवाडी व येडगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे. नदीकाठच्या लोकांनी सावधानतेचा इशारा पाटबंधारे नारायणराव क्रमांक एक विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर व विभागीय अधिकारी सुहास साळवे यांनी दिला आहे.

बुधवारी (दि.13) पाच हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग होता, तर गुरुवारी (दि.14) दुपारपासून पावसाने जोरधरल्याने, तसेच हवामान विभागाने पुण्यात रेड अलर्ट जाहीर केला असून, जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. चिल्हेवाडी व येडगाव धरण पूर्ण भरल्याने जास्त विसर्गाने पाणी सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यासाठी नदीकाठच्या लोकांनी सावध राहण्याची गरज असून, विद्युत पंप, शेतीविषयक साहित्य, जनावरे किंवा वस्ती सुरक्षित स्थळी हलविण्यात येण्याची सूचना देण्यात आली आहे.

पाण्याचा विसर्ग बुधवारपेक्षा गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात सोडावा लागणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी सर्वांनीच वेळीच सावध राहण्याची गरज असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. कुकडी नदीला सर्वाधिक विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने सर्वांनीच सावध राहण्याची सूचना पाटबंधारे विभागाने दिली आहे.

रांजणखळगे पाणीकुंड तुडूंब

बुधवारी (दि.13) रात्री हजार, दोन हजार ते पाच हजार क्युसेकने पाणी सोडल्याने जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील कुंड पाण्याने काठोकाठ भरले आहे. यापेक्षा चारपटींनी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने पाणीकुंड परिसरातील मंदिरात पाणी जाणार असून, शिवाय हेच पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावध राहण्याची सूचना पाटबंधारे विभागाने दिली आहे.

धरणांचा पाणीसाठा

  • येडगाव धरण – 83.86
  • माणिकडोह – 39.22
  • वडज -58.20
  • पिंपळगाव जोगे – 29.66
  • डिंभे – 34.39
  • विसापूर – 17.45
  • चिल्हेवाडी – 76.54
  • घोड – 21.88

Back to top button