नगर : कपाशीने एक लाख हेक्टर क्षेत्र ओलांडले | पुढारी

नगर : कपाशीने एक लाख हेक्टर क्षेत्र ओलांडले

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या रिमझिम सर्‍यांमुळे शेतशिवार ओलेचिंब झाली असून खरीपाची रानंही हिरवाईने नटल्याचे पहायला मिळत आहे. काल गुरुवारअखेर जिल्ह्यात 75 टक्के पेरणी झाली असून, त्यात तब्बल 1 लाख हेक्टरवर कपाशी, तर सोयाबीनखाली 95 हजार हेक्टर क्षेत्र व्यापले आहे.

जिल्ह्यात खरीपाचे सरासरी 5 लाख 71 हजार 768 हेक्टर क्षेत्र आहे. यंदा उशीराने पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. दक्षिणेतील काही तालुक्यांत पावसाने हुलकावणी दिल्याने त्या ठिकाणी मूग पेरणीला मोठा फटका बसल्याचे दिसले. तर तूर आणि उडीदाचा मात्र समाधानकारक प्रमाणात पेरा झाला. याउलट अन्य तालुक्यांत उशीरा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्या चांगल्या प्रमाणात झाल्याचे पुढे आले.

जिल्ह्यात तूर 40394, मूग 36608, उडीद 51580, सोयाबीन 95161, बाजरी 55669, भात 1748, मका 37496 हेक्टरवर घेतली आहे. याशिवाय भूईमूग, सूर्यफूल, तीळ, इतर तेलबियाही काही भागात घेतल्या आहेत. त्यामुळे काल गुरुवार दि. 14 जुलैच्या आढाव्यात जिल्ह्यात 4 लाख 29 हजार 764 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाल्याचे पुढे आले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वदूर आषाढ सरी सुरू आहेत. त्यामुळे मुळा आणि भंडारदरा, निळवंडेतील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याशिवाय मुळा आणि प्रवरा नद्याही वाहत्या झाल्या आहेत. गोदावरीही 60 हजार क्युसेकच्यापुढे वाहताना दिसली. त्यामुळे यावर्षी धरणात मुबलक पाणी जमा होण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

यातील बहुतांशी धरणे ही दोन दिवसांत 50 टक्के साठा ओलांडण्याची चिन्हे आहेत. या संततधार पावसामुळे पिकांनाही संजीवनी मिळताना दिसत आहे. सर्वदूर खरीप पिके डौलात उभे असल्याचे पहायला मिळते.

कपाशीची 84 टक्के लागवड पूर्ण
गेल्या वर्षी कपाशीला प्रति क्विंटल 10 हजारापर्यंत भाव मिळाला. त्यामुळे यावर्षीही शेतकर्‍यांना कपाशी लागवडीचे मोठे आकर्षण आहे. त्यातून, यंदा कपाशीचे क्षेत्र विक्रमी प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने यावर्षासाठी 1 लाख 20 हजार हेक्टरवर कपाशी लागवडीचे उद्दीष्ठ ठेवले होते. काल गुरुवार दि. 14 जुलै अखेर कपाशीचे एक लाख दोन हजार पाचशे हेक्टर व्यापले आहे. एकूण सरासरीच्या तुलनेत 84 टक्के कपाशी लागवड पूर्ण झाली आहे. येणार्‍या काळात 100 टक्केच्या पुढे ही लागवड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रमुख पिके हेक्टर क्षेत्र
तृणधान्य 94911
कडधान्य 134429
तेलबिया 97917
कापूस 102507

Back to top button