गुरुचरणी ठेविला माथा..! श्री क्षेत्र भगवान गडावर गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी | पुढारी

गुरुचरणी ठेविला माथा..! श्री क्षेत्र भगवान गडावर गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी

खरवंडी कासार : पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र भगवानगड येथे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त गुरुपूजन व गुरुदीक्षा गुरुमंत्र कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. वारकरी संप्रदायातील मुख्य स्थान म्हणून भगवानगडाकडे पाहिले जात असून भगवानगडाचा मुख्य धार्मिक उत्सव म्हणूून गुरुपौर्णिमा उत्सवाकडे पाहिले जात आहे.

भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठातील आचार्य नारायण स्वामी यांच्या हस्ते गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांचे पूजन झाले. यावेळी सिद्धेश्वर संस्थानचे मठाधिपती विवेकांनद शास्त्री येळेश्वर सस्थांनचे मठाधिपती रामगिरी महाराज, भालगाव संस्थानचे नवनाथ महाराज गाडे, मिडसांगवी येथील सालसिद्धेश्वर संस्थानचे मठाधिपती हनुमान सातपुते, तागडगाव येथील भगवानबाबा संस्थानचे मठाधिपती अतुल शास्त्री, एकनाथवाडी येथील निरंजन सस्थांनचे मठाधिपती कृष्णा महाराज, ज्ञानेश्वरी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांचे पूजन केले. यावेळी संत भगवानबाबांच्या गादीला गुरुस्थानी मानणारे हजारो भाविक गुरुपूजन सोहळ्याला उपस्थित होते.

गुरुपौर्णिमेनिमित्त शेकडो युवकांनीही गुरू दीक्षा घेत तुळशीच्या माळा गळयात घातल्या. भगवानगडाचे संस्थापक, वारकरी संप्रदायाचे थोर उपासक संत भगवान बाबांकडून तुळशीची माळ गळ्यात घालून गुरुमंत्र घेतलेले हजारो भाविक आवर्जून उपस्थित होते, तसेच श्री संत भगवानबाबांच्या समाधीवर व गादीवर तुळशीची माळ ठेवून त्यांना गुरुस्थानी मानून सांप्रदायाची दीक्षा घेणार्‍या भाविकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुस्थान व गुरुगादीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी होतीे. गडाचे महंत डॉ. नामदेव शास्रींकडून गुरुमंत्र देण्याचा सामूहिक विधी होऊन संप्रदायाची दीक्षा देण्यात अली.

भगवान गडाचा शिष्य म्हणून भाविक नियमित वारी करतात. गुरुपौर्णिमेनिमित्त्े भगवान बाबांच्या समाधीस्थळ वेगळयाच अध्यात्मिक ऊर्जेने भारावून जाते, अशी भाविकांची अनुभूती आहे. दर्शन सोहळा, गादीपूजन सोहळा व गुरुमंत्र सोहळा सामूहिक स्वरूपात भव्य प्रमाणात साजरा करण्यात अला.

गडावरील सर्व उत्सवांपेक्षा गुरुपौर्णिमा सोहळा धार्मिक ष्टया खूप महत्त्वाचा समजला जातो.भगवान बाबांवर श्रद्धा व निष्ठा असलेला भाविक वर्षातून एक दिवस गुरुपौर्णिमेला गडावर येतात समाधी पूजन दर्शन सोहळ्यानंतर अकरा वाजता गुरुपौर्णिमेच्या मुख्य दर्शन सोहळा, गुरुमंत्र व दीक्षा कार्यक्रम होऊन दुपारच्या महापूजेनंतर महाप्रसादाचे वाटप होऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली. दरम्यान, चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसातही भाविक गुरुभेटीच्या ओढीने भगवान गडावर येताना दिसत होते. दर्शनानंतर त्यांच्या आनंदाला उधाण आले होते.

दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी संत भगवानबाबा, संत भीमसिंह महाराज यांच्या समाधी व महंत नामदेव शास्त्री यांचे दर्शन घेतले. सेवेकरी असणारे चोपदार व पोलिसांतर्फे पंगतीने महाप्रसाद देण्यात आला.

Back to top button