नगर : पिंपळगाव कौडामध्ये तिघांवर जीवघेणा हल्ला | पुढारी

नगर : पिंपळगाव कौडामध्ये तिघांवर जीवघेणा हल्ला

नगर : पुढारी वृत्तसेवा : पिकातील जनावरे हाकलल्याच्या रागातून तिघांवर तलवार, लोखंडी गज, कत्तीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी दुपारी पिंपळगाव कौंडा (ता. नगर) येथे घडली. हल्ल्यात तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तिघांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रमेश सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले, अविनाश सावत्या भोसले (सर्व रा. पिंपळगाव कौंडा) अशी आरोपींची नावे आहेत. या हल्ल्यात ज्ञानदेव कुंडलिक बनकर, बाजीराव मारूती बनकर, अभिषेक बाजीराव बनकर (सर्व रा. पिंपळगाव कौंडा) जखमी झाले आहेत.
ज्ञानदेव बनकर यांनी फिर्यादीत म्हटले, की रविवारी दुपारी ज्ञानदेव, बाजीराव व अभिषेक त्यांच्या शेताच्या बांधावर असताना शेळ्या व जनावरे शेतातील तुरीचे व मुगाचे पिक खात असल्याने अभिषेकने शेळ्या व जनावरे शेताच्या बाहेर हाकलून दिले.

रमेश भोसले याला त्याचा राग आल्याने त्याने तुषार व अविनाश यांना सांगितले. त्यांनी तिघांनी हातात तलवार, लोखंडी गज, कत्ती घेऊन अभिषेक, ज्ञानदेव व बाजीराव यांना मारण्याचा उद्देशाने त्यांच्याकडे आले. तुम्ही आमचे शेळ्या व जनावरे हाकलता, काय आमची दहशत कमी झाली काय, असे म्हणत अभिषेक, ज्ञानदेव व बाजीराव यांना जीवे ठार मारण्याचा उद्देशाने तलवार, गज व कत्तीने हल्ला करून जखमी केले असल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

Back to top button