नगर : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला जाग | पुढारी

नगर : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला जाग

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आपत्ती कक्ष सतर्क झाला असून, त्यासाठी प्रत्येक विभागात स्वतंत्र कर्मचारी नेमले आहेत. या कक्षाची जबाबदारी अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ सांभाळत आहेत. त्यांनी प्रभागनिहाय कर्मचारी नेमले असून, त्यांना सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आपत्ती कक्षाने मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. पोलिस, होमगार्ड, महसूल व जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवला आहे. शहरात पुराचे पाणी शिरणार्‍या परिसरात स्वतंत्र कर्मचारी नेमले आहेत. एखादी दुर्घना घडल्यास एकाच वेळी सर्व कर्मचार्‍यांपर्यंत संदेश जाऊन तत्काळ मदत मिळेल, अशी व्यवस्था निर्माण केली आहे. जास्तीच्या पावसामुळे शहरात काय पूर परिस्थिती उद्भवल्यास घ्यावयाची काळजी याबाबत सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना सूचित करण्यात आले आहे.

आपत्ती विभागाकडे काय?

एक रबरी बोट, लाईफ जॉकेट, लाईफ बाय, रस्सी, बॅटरी, रेस्क्यू टूल्स.

नगरमधील रेड पॉईंट

नालेगाव, काटवण खंडोबा, सावेडी, बोल्हेगाव, केडगाव, रेल्वेस्थानक हा परिसर रेड पॉईंट मानण्यात आला आहे.

‘त्या’ अधिकार्‍यांनी सजग रहावे

सीना नदी काठावर असणार्‍या प्रभागातील अधिकार्‍यांनी पावसाळ्यात सजग रहावे. सीना नदीला मिळणार्‍या सर्व ओढ्यांची सफाई करून घ्यावी. कोणत्या परिस्थिती नागरिकांच्या घरात पाणी घुसणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळा, मंगल कार्यालये घेणार

मनपा हद्दीतील सर्व शाळा व मंगल कार्यालयांचे फोन नंबर मागविण्यात आले आहेत. अचानक काही आपत्ती आल्यास मनपा मंगल कार्यालय व शाळा ताब्यात घेईल, अशा सूचना दिल्या आहेत.

आपत्ती निवारासाठी मनपाचा कक्ष सतर्क आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे.

                                                          – डॉ. प्रदीप पठारे, अतिरिक्त आयुक्त, मनपा

Back to top button