नगर : भाडेकरुंमुळे हटेनात धोकादायक इमारती! | पुढारी

नगर : भाडेकरुंमुळे हटेनात धोकादायक इमारती!

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गेले दोन दिवस शहरातील धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम राबविली. मात्र, सूचना देऊनही काही धोकादायक इमारतींमधील भाडेकरू घर सोडीत नाहीत. तर, दुसरीकडे काही ठिकाणी जेसीबी मशिनही जाऊ शकत नसल्याने तूर्तास ही धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम थांबविण्याची नामुष्की मनपावर आली आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर शहरात गेल्या शंभर ते सव्वाशे वर्षांपूवीच्या धोकादायक इमारती उभ्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या सामान्य माणसाच्या जीविताला धोका आहे. धोकादायक इमारतींबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे 162 तक्रारी दाखल झाल्या आहेत. पावसाळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून धोकादायक इतारतींची माहिती संकलित करण्यात आली. मनपातर्फे धोकादायक इमारतीची नावे जाहीर निवेदनाद्वारे प्रसिद्ध करून रहिवाशांना इमारती उतरवून घेण्याबाबत आवाहन केले होते.

दरम्यान, धोकदायक इमारतीचे मूलमालक अथवा भाडेकरून वारंवार नोटिसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे मनपा बांधकाम विभागाने शहरात सुमारे 15 इमारती अत्यंत धोकादायक असल्याचे जाहीर केले. गेल्या आठवड्यात माळीवाडा, चौपाटी कारंजा, मंगलगेट, सर्जेपुरा आदी भागातील सहा इमारती पाडल्या. ही महापालिकेची पंधरा वर्षातील धडक कारवाई होती. उर्वरित नऊ इमारती मनपाच्या रडावर असताना काही ठिकाणी त्या धोकादायक इमारतीत भाडेकरू राहत आहेत. मूळ मालकाने सांगून भाडेकरू इमारत सोडण्यास तयारी नाहीत. त्यांचा वाद न्यायालयात गेला आहे. त्यामुळे मनपाला धोकादायक इमारत पाडण्याची मोहीम थांबवावी लागली.

मूळ मालकांची मनपात धाव

महापालिकेने गेल्या पंधरा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच धोकादायक इमारती पाडण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक मालकांनी थेट मनपाच्या बांधकाम विभागात धाव घेतली आहे. आमची इमारत पाडण्याची कारवाई करा, त्याचा खर्च आम्ही देतो, असे सांगून इमारत पाडण्याची मागणी केली.

अतिक्रमणधारकांची दादागिरी

शहरातील धोकादायक इमारतीच्या आवारात आणि इमारतीत अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. ते मूळ मालकांना माहीतही नाही. मूळ मालकांनी विचारणा केली असता ते अतिक्रमणधारक दादागिरी करीत असल्याने मूळमालक हैराण झाले आहेत. आता दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न मूळमालकांना पडला आहे.

पहिल्या टप्प्यात सहा इमारती पाडण्यात आल्या आहेत. अन्य इमारती पाडण्यासाठी अडचणी येत आहेत. काही भागात जेसीबी मशिन जात नाही. तर, काही इमारतींमध्ये भाडेकरू राहात आहेत. त्यामुळे अतिक्रमणे काढताना अनेक अडचण निर्माण होत आहेत. त्यावर तोडगा काढून दुसर्‍या टप्प्यातील अतिक्रमण हटाओ मोहीम लवकरच सुरू करण्यात येईल.

– सुरेश इथापे, शहर अभियंता, मनपा

Back to top button