नगर : देवळाली प्रवरा पालिकेत भाजपविरुद्ध सर्व पक्षीय एकवटणार | पुढारी

नगर : देवळाली प्रवरा पालिकेत भाजपविरुद्ध सर्व पक्षीय एकवटणार

देवळाली प्रवरा : पुढारी वृत्तसेवा : देवळाली प्रवरा नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 10 प्रभागांतून 21 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व आरपीआय गट शिवाय मित्रपक्ष असा सामना यंदाच्या निवडणुकीत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रत्येक पक्षांनी निवडणुकीची व्यूहरचना आखणास प्रारंभ केला आहे. बैठकांनी जोर धरला आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेत भाजपची एक हाती सत्ता होती. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या रूपाने प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला, मात्र सत्ताधार्‍यांना पुरेपूर विरोध करण्यात हे दोन्हीही अपयशी ठरले. दरम्यानच्या काळात बर्‍याच राजकीय घडामोडी घडल्या. भाजपकडून निवडून गेलेल्या 4 नगरसेवकांनी मावळते नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रवादीशी घरोबा केला. आपल्यावर नाराज होऊन 4 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात गेल्याची चिंता न करता कदमांनी आपल्या विकास कामांचा तडाखा सुरूच ठेवला.

गेल्या महिन्यात देवळाली प्रवरा सेवक सोसायटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप तथा कदम पिता- पुत्रांनी तयार केलेल्या देवळाली प्रवरा विकास मंडळाला पायउतार करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय, आ. बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन लोकसेवा मंडळाच्या माध्यमातून मूठ बांधली, मात्र या निवडणुकीत सभासदांनी विरोधकांच्या परिवर्तनाला साथ न देता कदम पिता- पुत्रावर विश्वास ठेवून विकास मंडळाला सर्वच्या सर्व 13 जागा निवडून दिल्या.

कट्यारला सोसायटीत विरोधकांचा प्रयत्न फसला

भाजप तथा कदम कट्यारला सोसायटीतून थोपवण्यासाठी विरोधकांनी केलेले प्रयत्न पूर्णतः अयशस्वी ठरला. आपसुक देवळाली प्रवरात भाजपचाच वर्चस्व पहावयास मिळाले. या पराभवाचा विरोधकांनी चांगलाच धस्का घेतला. याचवेळी भाजपकडून निवडून आलेले व नंतर राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केलेले माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, आदिनाथ कराळे, बाळासाहेब खुरुद व ज्ञानेश्वर वाणी यांची आपण आगीतून उठून फुपाट्यात पडल्याच्या अवस्थेची चर्चा ऐकु येत आहे.

देवळाली सोसायटीच्या निवडणुकीनंतर या चार नगरसेवकांनी एकत्र येऊन लोकसेवा मंडळाचे नेतृत्व करणार्‍या काही नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पालिका निवडणुकीवेळी तुम्ही मंडळाच्या माध्यमातून निवडणूक लढणार असाल तर आम्ही तयार नाही. पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणे गरजेचे आहे, असे जाहीर बोलून दाखवल्याचे समजते. दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच देवळालीसह राहुरी फॅक्टरीतील इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे. काही झालं तरी पालिकेतून सत्ता जाऊ द्यायची नाही. तगडे उमेदवार देऊन पुन्हा विजयश्री खेचुन आणायची, यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तत्काळ मावळते नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी बागायत पीक सोसायटी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीला माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, माजी शहराध्यक्ष अजित चव्हाण, सचिन ढुस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

‘दादा’ देवळाली पालिकेतपण लक्ष घाला..!’

काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन निवडणुकीच्यादृष्टीने चर्चा केली. अशोक खुर्द, अरुण डोळस, दीपक त्रिभुवन यांनी माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राहुरीत पार पडलेल्या मेळाव्यास हजेरी लावत, ‘दादा’ देवळाली नगरपालिकेतपण लक्ष घाला,’ अशी मागणी केल्याचे सूत्रांकडून समजते.

शिवसेना कोणाच्याही नादी लागणार नाही..!

शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील कराळे यांनी, शिवसेना कोणाच्या नादी लागणार नाही. आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले.

Back to top button