नगर : कर्जतमध्ये परप्रांतीय चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी

नगर : कर्जतमध्ये परप्रांतीय चोरट्यांचा धुमाकूळ

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात भरणार्‍या आठवडे बाजारांत नागरिकांचे मोबाईल व इतर वस्तू आणि रोकड चोरण्यासाठी आता थेट परराज्यातून चोरटे येऊ लागले आहेत. त्यामुळे बाजारकरू त्रस्त झाले आहेत.

यापूर्वी बाजारात चोरी करणार्‍या अनेक पुरुष व महिलांना पोलिसांनी अनेकदा पकडले असले, तरी तालुक्यातील कर्जत शहरासह मिरजगाव व राशीन या मोठ्या आठवडे बाजारांतील चोर्‍या रोखणे कर्जत पोलिसांसमोर मोठे आव्हानच होते. गर्दीचा फायदा घेऊन दुचाकी, मोबाईल, पर्स, रोकड चोरीची अनेक प्रकरणे वारंवार घडत होती. या चोर्‍या रोखाव्यात म्हणून पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये सतत जनजागृती केली. पोलिसांच्या गस्तीही वाढविल्या. मात्र, चोरीच्या घटनाच घडू नयेत व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आता यादव यांनी ’अनाऊन्सिंग सिस्टिमची शक्कल लढविली आहे.

तालुक्यातील मोठ्या बाजारात अनाऊन्सिंग सिस्टिमची जोडणी करून बाजारात खरेदीसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला पोलिसांनी दिलेल्या सूचना ऐकायला मिळत आहेत. मोबाईलवरच्या खिशात न ठेवता तो खालच्या खिशात ठेवावा, आपली पर्स, महागड्या वस्तू सांभाळा, चोरीबाबतच्या हालचाली आढळल्या, तर लगेच तेथील पोलिसांना कळवा’ अशा अनेक सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत.
याअगोदर अनेक मोबाईल चोरांना, पर्स चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु एवढे करूनही गर्दीचा फायदा घेऊन संधी साधणार्‍या चोरट्यांना रोखणे ही कठीण बाब आहे.

अनेकवेळा बाजारात भाजी, किराणा किंवा साहित्य विकत घेताना महिला व पुरुष त्या वस्तू आपल्या पिशवीत ठेवण्यासाठी खाली वाकतात. याचाच फायदा घेऊन चोरटे संधी साधतात. चोरटे बाजारातील खरेदीदार नागरिकांच्या शेजारी उभा राहून भाजी घेतल्याचा बहाणा करतात आणि क्षणात मोबाईल, पर्स व इतर वस्तूंवर डल्ला मारतात. काही वेळेत आपल्याला चोरी झाल्याचे समजते. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून होणारे नुकसान टाळावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक यादव यांनी केले आहे.

पोलिसांनी लढवलेल्या या शक्कलीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक चोरट्यांना या सिस्टिममुळे जरब बसली असून, बाजारांतील चोर्‍यांना आळा बसत आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांचे जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे.

चोरी करताच गावाकडे पलायनाचा फंडा

मोबाईल चोरीच्या प्रकरणात तसेच वेगवेगळ्या बाजारात कर्जत पोलिसांनी अशा चोरट्यांना जेरबंद केले आहे.चोरी केल्यानंतर पलायन करून स्वतःच्या गावी हे चोरटे जात आहेत. त्यामुळे अशा चोरट्यांना रोखण्यासाठी पोलिस पेट्रोलिंगसह अनाऊन्सिंग सिस्टिमचा चांगलाच उपयोग होत आहे.

Back to top button