पाथर्डी : विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात, एक ठार तर तीन गंभीर | पुढारी

पाथर्डी : विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात, एक ठार तर तीन गंभीर

पाथर्डी तालुका :  पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील दर्शन घेऊन येणाऱ्या वारकऱ्याची पिकप गाडी पलटून एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.तर तीन वारकरी यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघातात दहा ते बारा वारकरी किरकोळ जखमी झाले असून जखमींमध्ये महिला व पुरुष वारकऱ्यांचा समावेश आहे.

गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अहमदनगरच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यातील धनगरवाडी येथील वारकरी हे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन परत येत असताना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हाकेवाडी फाट्यावर हा अपघात होऊन यामध्ये रावण सखाराम गाढे वय ५५ या वारकऱ्यांचा मृत्यु झाला.

धामणगावरून धनगरवाडीच्या दिशेने येणारी वारकऱ्यांची पिकअप गाडी हाकेवाडी फाट्या नजीक आले असता ह्या बारामती – औरंगाबाद राज्य महामार्गावर रस्त्याच्या बाजूला व डांबरी रस्त्यावर खडीचा ढीग पडलेला होता. या खडीचा ढिगारावरून गाडी जाऊन पिकप गाडी पलटी झाली.हा अपघात रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

या सर्व वारकऱ्यांचे गाव अगदी पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर राहिले असताना हि अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात रावण गाडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बंडू बाजीराव गाढे , हरी बबन चितळे, अशोक रावसाहेब चितळे, शोभा महादेव चितळे, गोरक्ष दादाबा गाढे, कोंडाबाई पंढरीनाथ गाढे, तुळशीराम नामदेव गाढे, सुधाकर भाऊ गाढे सर्व राहणार ( धनगरवाडी ता पाथर्डी)या जखमींना अहमदनगरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच धनगरवाडीचे अशोक गाढे, मिठू चितळे, मच्छिंद्र चितळे,आजिनाथ गाढे, प्रकाश चितळे, भाऊ पवार, नारायण पवार आदींनी अपघातग्रस्तांसाठी मदत केली. माणिकदौंडीचे माजी पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ यांनी या घटनेची माहिती आमदार मोनिका राजळे यांना देऊन राजळे यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना सहकार्य केले.अपघातात मृत पावलेले रावण गाढे यांच्या वारसाला व अपघातात जखमी असलेले वारकरी यांच्या रुग्णालयाच्या खर्चासाठी राज्य सरकार कडून मदत होण्यासाठी आपण आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ओव्हळ म्हणाले.

Back to top button