नेवासा : डिझेल, रस्ता लुटीतील आरोपी जेरबंद | पुढारी

नेवासा : डिझेल, रस्ता लुटीतील आरोपी जेरबंद

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी सहकार्‍यांसोबत राबविलेल्या कोंबिग ऑपरेशनमुळे परराज्यातील डिझेल चोरी करणारी टोळी अलगद जाळ्यात सापडली. महामार्गावर वाहनांची लूट करणार्‍या म्होरक्यांवर कायद्याचा बडगा उगारत मुसक्या आवळल्याने जनतेतून पोलिसांचे कौतुक होत आहे.

पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘वचक’ निर्माण झाल्याने नेवासा पोलिसांचा ‘दरारा’ वाढल्यामुळे गुन्हगारांची पाचावर धारण बसली आहे. रस्ता लूट करणार्‍या गुन्हेगारांना मुद्देमालासह गजाआड करण्यात आल्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
पोलिस निरीक्षक विजय करे यांनी पोलिस ठाण्याची सूत्रहाती घेतल्यानंतर कायद्याचे पालन होताना दिसून येत आहे.

नगर-औरंगाबाद महामार्गावर डिझेल चोरी करणार्‍यांची मोठी टोळी सक्रिय असल्यामुळे या परिसरात गाड्यांचा बिघाड झाल्यास वाहनातील डिझेल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या होत्या. तसेच रस्ता लूटही सुरू होती. पोलिसांनी डिझेल चोरी व रस्ता लूट प्रकरणातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा लावूनही काही गुन्हेगार पसार झाले होते. पोलिस निरीक्षक करे व पोलिस फौजफाट्याने धूमस्टाईल पाठलाग करुन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

डिझेल चोरी प्रकरणातील आरोपींनी निरीक्षक करे यांच्यासह पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या झटापटीत निरीक्षक करे यांच्यासह काही पोलिस कर्मचारी जखमीही झालेले होते. अखेर पोलिसांनी जीवाची बाजी लागून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्यामुळे महामार्गावरील चोर्‍यांना आळा बसला असून, नेवासा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होतांना दिसून येत आहे.

Back to top button