अकोले : भंडारदरा परिसरातील 4 धरणे भरली | पुढारी

अकोले : भंडारदरा परिसरातील 4 धरणे भरली

अकोले : पुढारी वृत्तसेवा : मुळा-प्रवरा पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला असला तरी, गेले दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने ओढे, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. परिणामी शिरपुंजे, सागवी, कोथळे, पाडोसी लघुपाटबंधारे तुडूंब भरले आहेत. हरिश्चंद्र गड व कळसूबाई शिखर परिसरात गेले दोन-तीन दिवस पावसाने रुद्र रुप धारण केल्यामुळे भात आवणीच्या कामाना जोर आला आहे. तर, पहिल्या पावसात आंबित व पिंपळगाव खांड धरण भरले होते.

शनिवारी वाकी धरणही भरले आहे. परंतु, पावसाचे आगार असलेल्या अकोले तालुक्यातील मुळा खोर्‍यातील पाचनई, पेठेवाडी, कुमशेत, शिरपुंजे, जानेवाडी परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे कोथळा धरण 182 दशलक्ष घनफूट पूर्ण क्षमतेने शनिवार रात्री नऊ वाजता भरले आहे. तर शिरपुंजे धरण 155 क्षमता असलेले धरण रात्री बारा वाजता भरले.

आढळा परिसरात असलेल्या पाडोसी धरणाची साठवण क्षमता 140 दशलक्ष घनफूट असून रविवारी दुपारी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर, पाडोसीच्या खाली असलेल्या सांगवी धरणाची क्षमता 71 दशलक्ष घनफूट असून, तेही सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे देवठाण येथील आढळा धरणाकडे या दोन्ही धरणाचे पाणी झेपावले आहेत.

भंडार्‍यात 4847 दलघफू पाणीसाठा
पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या घाटघर व रतनवाडीला 9 इंच पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणाचा आजचा पाणीसाठा 4847 दशलक्ष घनफुटावर पोहचला असून, गेल्या 12 तासांत 191 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. आतापर्यंत रतनवाडी 229 मिलीमीटर (एकूण 1501 मिलीमीटर) , भंडारदरा 209 मिलीमीटर (942 मिलीमीटर), घाटघर 230 मिलीमीटर (एकूण 1489 मिलीमीटर), वाकी 167 मिलीमीटर (690 मि.मीटर) एकूण मिलीमीटर पावसाची नोंद पाटबंधारे विभागात झाली आहे.

Back to top button