नगर : तब्बल 1797 अर्भक मृत्यू ! आकडेवारी चिंता वाढवणारी | पुढारी

नगर : तब्बल 1797 अर्भक मृत्यू ! आकडेवारी चिंता वाढवणारी

नगर : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे कुपोषणाचे प्रमाण कमी होत असल्याचे प्रशासन सांगत असले तरी, प्रत्यक्षात अजूनही अर्भक, बाल आणि माता मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात 303 बालमृत्यू झाले आहेत. 1797 अर्भक मृत्यू आणि 84 मातांचा मृत्यू झाल्याचे आकडे सांगत आहेत.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमांतून ही आकडेवारी कमी होताना दिसत असली, तरी हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सीईओ आशिष येरेकर यांना त्यांचे ‘व्हिजन’ दाखवावे लागणार आहे.

जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि एकात्मिक महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरोदर मातांपासून ते बालकांच्या सृदढ आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, सरकारी यंत्रणेकडे असलेले अपुरे मनुष्यबळ, जनजागृतीचा अभाव यासह बालकांची अपुरी वाढ, आजारी माता, गर्भाशयातील संसर्ग, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, कुपोषित माता आदी कारणांमुळे बालमृत्यू होत आहे.

अर्भक मृत्यू आणि माता मृत्यूंची कारणांचीही मिमांसा केली असता कुपोषण आणि गरोदरपणात आवश्यक काळजी न घेणे, हीच प्रामुख्याने कारणे पुढे येतात. अशा विविध कारणांमुळे 2019 ते 2022 या तीन वर्षांच्या कालावधीत 303 बालकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जन्मजात 1797 अर्भकही दगावल्याचे पुढे आलेले आहे.

तर, याच तीन वर्षांत 84 मातांनीही आपला जीव गमावला आहे. बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या, लोहाची मात्रा वाढविणारे औषध, व्हिटॅमिनचे ठराविक डोस दिले जातात. जिल्ह्यात सध्या अतिसार पंधरवाडा राबविला जात आहे. दरम्यान, महिलांच्या गर्भधारणेच्या वेळी लाखोंचा खर्च करत पोषण आहार दिला जातो. मातृवंदना योजनेतूनही अर्थसहाय्य दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्याचा किती लाभार्थ्यांना लाभ मिळतो, हा चिंतनाचा विषय आहे.

4500 मातांना लाभच नाही
पंतप्रधान मातृवंदना योजनेतून गरोदर मातांना आहारासाठी पाच हजारांचा लाभ दिला जातो. मात्र, जिल्ह्यातील 4500 महिलांच्या आधारकार्डमध्ये अडचणी असल्याचे कारण पुढे करत हा लाभ दिलेला नाही.

आहारातून ‘पोषण’ कोणाचे?
गरोदर व स्तनदा मातांना बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत गहू, साखर, मिरची पावडर, हळदी पावडर, चना, मूगडाळ याचा आहार दिला जातो. प्रत्यक्षात हा आहार नियमित आणि चांगल्या दर्जाचा मिळतो का? यावरही मंथन होण्याची गरज आहे.

16.50 लाखांचा अतिरिक्त आहार!
तत्कालिन म. व बालकल्याणच्या सभापती मिरा शेटे यांनी माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी सेसमधून अतिरीक्त पोषण आहारासाठी 16.50 लाखांची तरतूद केली आहे. प्रशासनाने ही योजना पारदर्शीपणे राबविल्यास निश्चितच मृत्यूदर रोखण्यासाठी मदत होणार आहे.

 

सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात मातामृत्यू, बालकांचे मृत्यू आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाकडून मातांची जनजागृती, लसीकरण पंधरवाडे, पंतप्रधान माृतवंदना योजना यासारखे अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. येणार्‍या काळात हा मृत्यूदर निश्चितच आणखी कमी होईल.

डॉ. संदीप सांगळे
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गरोदर मातांना पूरक पोषण आहार देणे, जनजागृती करणे, त्यांची तपासणीबाबत काळजी घेणे, नियमित लसीकरण करणे, याबाबत लक्ष दिले जाते. याशिवाय माता बैठका घेऊन त्यामध्ये गरोदरपणात घ्यायची काळजी, घ्यायचा आहार-विहार याबाबत सल्ला दिला जातो.
– मनोज ससे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म.बा.कल्याण

बालमृत्यू ( 1 ते 5 वर्षे)
2019-20 119
2020-21 87
2021-22 97

अर्भक मृत्यू (0 ते 1 वर्षे)
2019-20 737
2020-21 576
2021-22 484

माता मृत्यू
2019-20 34
2020-21 28
2021-22 22

Back to top button