मलकापूर : अंगणवाडीच्या खोल्या धोकादायक | पुढारी

मलकापूर : अंगणवाडीच्या खोल्या धोकादायक

ढोरजळगाव : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत मलकापूर येथील अंगणवाडीच्या खोल्या धोकादायक झाल्या आहेत. पावसामुळे या खोल्यांचा स्लॅब कुठल्याही क्षणी कोसळून दुर्घटना घडू शकते. तथापि अशाही परिस्थितीमध्ये चिमुकले आपला जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे घेत आहेत.

मलकापूर येथे अंगणवाडीची स्लॅबची खोली आणि पोर्च असे जुने बांधकाम असून, काही वर्षांपूर्वीचीच असलेली इमारत निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लवकरच मोडकळीस आली आहे. भिंतीना मोठ्या भेगा आणि स्लॅबला झोळ पडून गज उघडे पडले आहेत.
अशा परिस्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून चिमुरडे ऊन, वारा, पावसामध्ये बाहेर उघड्यावरच शिक्षण घेत आहेत.

इमारतीसाठी चा प्रस्ताव मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता मिळून 6 महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामासाठी अजूनही घोडे अडलेलेच आहेत. शेजारीच जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे निंबोडीच्या दुर्घटनेनंतर निर्लेखन होऊन दोन खोल्या पाडण्यात आल्या. त्याला दोन वर्षे उलटली आहेत.राहिलेल्या एकाच वर्गामध्ये पहिली ते चौथीपर्यंत च्या विद्यार्थ्यांना बसवले जाते आणि पावसामुळे त्याही खोलीला गळती लागून वर्गामध्ये पाणी साचत आहे.

एक वर्ग खोली मंजूर झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्ष कामासाठी अजून किती वेळ लागतो देव जाणे . ज्ञान दानाच्या या पवित्र मंदिराकडे अक्षम्य दुर्लक्ष करून प्रशासन या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळत आहे. निंबोडी दुर्घटने पासून बोध घेऊन तत्काळ शाळा खोली व अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मलकापूर येथील अंगणवाडीची इमारत बांधकामासाठी 8.50 लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेमार्फत मंजूर होऊन प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे .प्रत्यक्ष कामासाठी लवकरच सुरवात होईल.
– बी. के. गडधे
   एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, शेवगाव

Back to top button