सांदण दरी आता पर्यटकांसाठी झाली बंद, वनसंरक्षक विभागाचा निर्णय | पुढारी

सांदण दरी आता पर्यटकांसाठी झाली बंद, वनसंरक्षक विभागाचा निर्णय

अकोले : पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असलेल्या घाटघर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक धबधबे, सांदण (दरी) व्हॅली परिसर हा पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याची माहिती वन्यपरिक्षेत्र अधिकारी ए. एन. आडे यांनी दिली आहे.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेली दोन आठड्यांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. घाटघर परिसरात चोवीस तासात सुमारे 191 मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. साम्रद, रतनवाडी, घाटघर, उडदावणे, कोलटेभें परिसरात पावसाचे प्रमाणात दोन दिवसांपासून वाढ होत आहे. परिणामी डोंगर माथ्यावरुन धबधबे कोसळताना दिसत आहे. तर कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्र गड, पांजरे फॉल, अमृतेश्वर मंदिर, वसुंधरा फॉल, उंबरदरा,नेकलेस फाँल, न्हानी फॉल भागात पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे.

डोळ्याचे पारणे फेडणारे व आशिया खंडातील सर्वात खोल दर्‍यांमध्ये समावेश असलेल्या सांदण व्हॅली पाहण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात गर्दी करीत असतात. परंतु पावसाचा जोर व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यातील सांदण व्हॅली, कोकणकडा, धोकादायक असलेले पांढरे शुभ्र धबधबे या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यक ती सर्व प्रकारची खबरदारी वन्यजीव विभागाकडून घेण्यात आली आहे.

दरम्यान हौशेनौशे पर्यटकांना रोखण्यासाठी धोकादायक ठिकाण, धबधबे, व्हॅलीमध्ये (दरी) वन्यजीव विभागाकडून ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहे. तर सांदण व्हॅलीत उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या ठिकाणी कुणीही प्रवेश करू नये. म्हणून वन्यजीव कर्मचार्‍यांचा मोठा बदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पावसाचे आगार असलेल्या घाटर, साम्रद, रतनवाडी परिसरात पाऊस असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांदण व्हॅली,धोकादायक धबधबे पर्यटनासाठी बंद केली आहे. मद्यपान करणारे व पाण्याच्या धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे, नियमांचे पालन न करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पर्यटकांनी पर्यटनस्थळी जास्त गर्दी करू नये, असे आवाहन पर्यटकांना करण्यात आले आहे.
गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक, नाशिक.

Back to top button