दिघोळ परिसराला आता पूर्ण दाबाने वीजपुरवठा

दिघोळ परिसराला आता पूर्ण दाबाने वीजपुरवठा

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील दिघोळ परिसरातील गावांची विजेची समस्या आता कायमची संपुष्टात आली आहे. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून नवीन वीज उपकेंद्र मंजूर झाले आहे. मतदारसंघातील विजेची अडचण दूर करण्यासाठी आमदार पवार यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला.

त्यांच्या प्रयत्नांतून दिघोळ येथे नव्याने 33/11 वीज उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्याला आता मंजुरी देखील देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आमदार पवार यांनी मार्गी लावला आहे. तालुक्यातील दिघोळ, जातेगाव, जायभायवाडी, तेलंगशी, धामणगाव, माळेवाडी येथील शेतकर्‍यांच्या वीजपंपांना, घरगुती व इतर ग्राहकांना खर्डा येथील 33/11 वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. परंतु उपकेंद्रापासून ही गावे 25 ते 30 किलोमीटर दूर असल्याने पुरेशा दाबाने व व्यवस्थित वीजपुरवठा होत नव्हता.

दिघोळ येथे नवीन उपकेंद्र उभारल्यास या समस्या दूर होतील, या अनुषंगाने आ. पवार यांनी नव्या उपकेंद्रास मान्यतेसाठी मोठे प्रयत्न केले. त्यातून आता नवे वीज उपकेंद्र दिघोळ येथे मंजूर झाले आहे. त्यामुळे परिसरात अखंड व उच्चदाबाने वीजपुरवठा होणार असून, शेतकर्‍यांच्या विजेसंदर्भातील अडचणी दूर होणार आहेत. यासोबतच खर्डा उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या खर्डा, सातेफळ, लोणी, वाकी व वाड्या वस्त्यांनाही खर्डा उपकेंद्रावरील ताण कमी होणार असल्याने फायदा होणार आहे.

यापूर्वी नायगावला वीज उपकेंद्र मंजूर करून आणले होते. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचा आसपासच्या 7-8 गावांना फायदा होणार आहे. राजुरी उपकेंद्रावरील ताण कमी होणार आहे. यासोबतच मतदारसंघात काही ठिकाणी सोलर प्रकल्पदेखील उभारण्यात आले असून विविध ठिकाणी नवीन लिंक लाइनचे काम, नवीन रोहित्र बसविणे, नादुरुस्त रोहित्रे त्वरित बदलून देणे अथवा दुरुस्त करून देणे, नव्याने वीज उपकेंद्रांची उभारणी करणे आदी विजेच्या संदर्भातील विविध अडचणी सोडविण्याचा प्रयत्न आ. पवार करीत आहेत.

विजेबाबत आमदार पवार यांची तत्परता
तालुक्यात विविध ठिकाणी लिंकलाईन, तसेच जामखेड शहरात 16 किमी केबल टाकण्याचे काम झाले आहे. अजून 7 किमी केबलचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पूर्ण दाबाने वीज मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news