

जवळा : पुढारी वृत्तसेवा : येथील ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या उन्हाळ्यात महादेव मंदिर परिसरातील ओढा पात्रात एक विहीर खोदली. मात्र, ठेकेदाराने पैशांसाठी तगादा लावण्याचे ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी चक्क ही विहीर विक्रीलाच काढली. दुसरीकडे विहीर खोदण्यासाठी लागणारी परवानगीच घेतली नसल्याची बाब आता समोर आली आहे.
त्यामुळे ही विहीर आता चांगलीच चर्चेत आली. येथील ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या उन्हाळ्यात महादेव मंदिर परिसरातील ओढा पात्रात आठ लाख रुपये खर्चून एक विहीर खोदली. यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला. परंतु, यासाठी रितसर कोणतीही परवानगी न घेता विहीर खोदली; परंतु तिला उन्हाळ्यात म्हणावे इतके पाणी लागले नाही.
यामुळे पदाधिकार्यांचा हा खेळ अंगावर आला; संबंधित ठेकेदाराने आता पदाधिकार्यांकडे पैशांसाठी तगादा लावला असून, त्यामुळे या ठेकेदाराचे झंजट मिटविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी नामी शक्कल लढवली असून, चक्क विहीरच विकायला काढली आहे, तर घेणाराही पदाधिकार्यांच्या जवळचा असल्याचे लोकांमधून बोलले जात आहे.
सुमारे दहा लाख रुपयांना या विहिरीचा सौदा ठरला आहे.
महावितरणने वीजजोड दिलेच कसे?
एरवी शेतकर्यांना किरकोळ कामासाठीही महिनोमहिने चपला झिजविण्यास लावणार्या महावितरणने अनधिकृत जागेतील विहिरीस खांब टाकून वीजजोड दिलेच कसे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
विहीर खोदण्याविषयी मासिक मीटिंगमध्ये ठराव घेतले आहे. त्यामुळे सर्वांना विचारात घेऊनच विहीर खोदण्यात आली.
– अनिता आढाव, सरपंच, जवळा.विहिरीच्या परवानगीसाठी आमच्याकडे कोणतेही कागदपत्रे आले नसून, महसूल दरबारी तिची नोंद नाही.
– दीपक साठे, तलाठी, जवळा.महादेव मंदिराजवळची अनधिकृत विहिरीची खरेदी विक्री झाल्यास सदर ग्रामपंचायत पदाधिकारी किंवा संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार.
-गोरख सालके, सामाजिक कार्यकर्ते.