दोघांनी लाखाला फसविले, रत्नागिरी पोलिसांचा नगरमध्ये तपास | पुढारी

दोघांनी लाखाला फसविले, रत्नागिरी पोलिसांचा नगरमध्ये तपास

नगर : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी पोलिसांनी फसवुणकीच्या गुन्ह्यात गुरूवारी नगरमधील सर्जेपुरा येथील एका अपार्टमेंटमधून दोघांना चौकशी कामी ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. रत्नागिरी येथील एका व्यक्तीने नवीन मोटारकार खरेदी केली. त्यानंतर काही दिवसांत त्याला मोबाईल मेसेज आला की तुम्ही लकी आहेत.

तुमची परदेशात फिरण्यासाठी निवड झाली आहे. त्यासाठी तुम्हाला आमच्या खात्यावर एक लाख रुपये भरावे लागतील. त्यानुसार त्या व्यक्तीने संबंधितांच्या खात्यावर एक लाख रुपये भरले. त्यानंतर ते पुन्हा पैशाची मागणी करू लगाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने रत्नागिरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिस तपासात संबंधित व्यक्तीला नगरमधून फोन गेल्याचे स्पष्ट झाले. त्यातील एका जण नगर शहरातील मुकुंदनगरमधील असल्याचे समोर आले. त्यानुसार आज दुपारी रत्नागिरी पोलिसांनी सर्जेपुरा येथील एका अपार्टमेंटमधून दोघांना चौकशी कामी ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दरम्यान, या घटनेबाबत शहरात वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या.

रत्नागिरी पोलिसांनी एक लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात नगरमधून दोघांना चौकशी कामी ताब्यात घेतले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
– ज्योती गडकरी, पोलिस निरीक्षक, तोफखाना

Back to top button