नगर : शिक्षक बँक; कुठे कार्यकर्त्यांवर मेहरनजर, तर कुठे स्वबळाचा आग्रह सुरू | पुढारी

नगर : शिक्षक बँक; कुठे कार्यकर्त्यांवर मेहरनजर, तर कुठे स्वबळाचा आग्रह सुरू

 नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँकेची अर्ज माघारीची मुदत जशी जशी जवळ येऊ लागली, तशा तशा काही मंडळात वर्चस्ववादातून अंतर्गत कुरबुरी अन् कुरघोड्यांना वेग येऊ लागला आहे. एका दिग्गज मंडळात उमेदवारी वाटपावरून ‘त्या’ दोघांमध्ये राजकीय ठिणगी पडल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे कोणाला सोबत घ्यायचे, आणि कोणासोबत जायचे, यावरूनही काही मंडळात अंतर्गत बंडाळी सुरू झाल्याने शिक्षक बँकेचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसते.

शिक्षक बँकेची निवडणूक 24 जुलै रोजी होणार आहे. तर, अर्ज माघारीची मुदत ही 11 जुलै आहे. आता अर्ज माघारीला अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे बैठकांना वेग आला आहे. सत्ताधारी गटाची बुधवारी मध्यरात्रीपर्यंत बैठक सुरू होती. यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल, तर इतरांना बरोबर घ्यायचे नाही, त्यातल्या त्यात ‘डॉक्टर’ला तर नकोच, असा अनेकांचा सूर आल्याची चर्चा आहे. तर, काही कार्यकर्त्यांनी छोट्या-छोट्या संघटनांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची सूचना मांडली. त्यावर मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी मात्र आपला अंतिम निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे.

दुसरीकडे, रोहोकोले गटातही उमेदवारी कोणाला द्यायची, याबाबत चाचपणी सुरू आहे. प्रवीण ठुबे व संजय शेळके आदी शिक्षक नेते तुल्यबळ उमेदवार शोधत आहे. मात्र, मंडळाचे नेते रावसाहेब रोहोकले यांच्याकडेच ‘रिमोट’ असल्याने तेच उमेदवार ठरविणार आहेत. ऐक्य, सदिच्छा, इब्टा, शिक्षक संघ, शिक्षक भारती या संघटना गुरुमाऊली, रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली आणि गुरुकुलच्या संपर्कात आहेत. जो सन्मानाने जागा देईल, त्याच्याकडे जाण्याची मानसिकता या संघटनांची आहे.

मात्र, त्यांना कोण व किती जागा देणार, ही मंडळे कोणासोबत जाणार की स्वतंत्र आघाडी तयार करणार, याबाबतही ठोस निर्णय झालेला नाही. एकूणच, शिक्षक बँकेसाठी बहुतांशी मंडळात युती-आघाडीवरून मतप्रवाह सुरू आहेत. याशिवाय उमेदवारी वाटपातही आपल्या निष्ठावंताला न्याय देण्यासाठी नेतेमंडळी इच्छुक असल्याने त्यातून नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे.

युती-आघाडीच्या चर्चेने इच्छुक अस्वस्थ!
बुधवारी मध्यरात्री एक बैठक झाली व त्यात सत्ताधारी गट आणि ‘डॉक्टर’ अशी युती झाल्याची वार्ता गुरुवारी सकाळी वार्‍यासारखी पसरली. ही युती झाली तर जागा वाटपात आपला पत्ता कट होणार, या भितीने दोन्ही मंडळांतील अनेक इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांनी फोनाफोनी सुरू केली. मात्र, ज्यावेळी सत्ताधारी गटाच्या एका जबाबदार नेत्याने अशी कोणतीही युती नाही, आपण स्वबळावर लढू, अशी कार्यकर्त्यांना ग्वाही दिल्यानंतर ‘त्यांना’ तूर्ततरी हायसे वाटले.

Back to top button