

नगर : पुढारी वृत्तसेवा : जलयुक्त शिवार अभियान2 अंतर्गत कामे घेण्यासाठी जिल्ह्यातील 257 गावांची निवड झाली खरी, मात्र यातील 253 गावांचे आराखडे गावकीच्या राजकारणातच अडले आहेत. केवळ चार ग्रामपंचायतींनी आराखडे जिल्हा प्रशासनाकडे सादर केले. 12 जूनपर्यंत हे आराखडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी केल्या होत्या. दरम्यान जलयुक्तचे काम आराखड्यावाचून अडले असले तरी या गावांत मुख्यमंत्री जलसंधारण योजना, जिल्हा नियोजनच्या निधीतून काही कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान-2 हा दुसरा टप्पा हाती घेतला आहे.
3 जानेवारी 2023 रोजी तसा शासन आदेश काढण्यात आला. जिल्ह्यातील 257 गावांची या अभियानासाठी निवड करण्यात आली. मृद व जलसंधारण विभाग, कृषी, वन, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण इत्यादी विभागांच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवक यांच्यासमवेत शिवारफेर्या काढण्यात आल्या. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शिवारफेर्या झाल्यानंतर 12 जूनपर्यंत गावनिहाय कामांचे आराखडे सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र सोमवारच्या आकडेवारीनुसार 257 पैकी केवळ चार गावांचे अंतिम गावआराखडे जलसंधारण विभागाकडे प्राप्त झाल्याचे समजले. त्यामुळे अजूनही 253 गावांमध्ये कोणती कामे घ्यायची, हे आराखड्यातून पुढे आलेले नाही. आराखड्यांची कामे कासवगतीने सुरू असल्याचे दिसते. आराखडे मंजूर झाल्यानंतर संबंधित विभाग त्यास तांत्रिक मान्यता देणार आहे, त्यानंतर जिल्हाधिकार्यांची प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर ही कामे सुरू होतील.
130 गावांत 664 कामे सुरू
एकीकडे आराखडे अपूर्ण असले, तरी दुसरीकडे इतर विभागांच्या माध्यमातून जलयुक्तची कामे सुरू केलेली आहेत. संबंधित 257 गावांपैकी 130 गावांत 664 कामे सुरू आहेत. ही कामे मुख्यमंत्री जलसंवर्धन विभाग, जिल्हा नियोजन विभागामार्फत केली जात आहे. आराखडे तयार नसली, तरी सध्या सुरू असलेल्या कामांच्या या आकडेवारीतून नगर राज्यात चौथ्या स्थानी असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
जबाबदारी कृषीकडून जलसंधारणकडे
यापूर्वी जलयुक्त अभियानाची जबाबदारी कृषी विभागाकडे होती; मात्र यंदा प्रथमच ती जलसंधारण विभागाकडे देण्यात आली आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे या अभियानाचे जिल्हा प्रमुख आहेत. प्रत्येक तालुक्याची जबाबदारीही एकाच जलसंधारण अधिकार्यावर असेल. त्यामुळे एकाच अधिकार्यावर अनेक गावांची जबाबदारी आल्याने याचा अभियानाच्या गतीवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यातील सर्व आराखडे हे 15 जूनपर्यंत पूर्ण होतील, त्यासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. मात्र आराखडे तयार झालेले नसले तरी वेगवेगळ्या योजनांतून कामे मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
-पांडुरंग गायसमुद्रे, जिल्हा जलसंधारण अधिकारी