नगर : शेवगावात विविध पक्षांचे धरणे | पुढारी

नगर : शेवगावात विविध पक्षांचे धरणे

शेवगाव शहर : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात सोमवारी (दि. 6) सकाळी जनता व्यासपीठासमोर राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भीमशक्ती संघटनांतर्फे प्रा. चंद्रकांत कर्डक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

नगरपरिषद कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर न होणे, फंड न मिळणे, व्यापारी संकुल बांधणे, भाजी मंडई उपलब्ध करून देणे, रमाई घरकुल मंजुरीचे प्रस्ताव सादर करणे आदी मागण्यांसाठी विविध पक्ष व संघटनांतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रा.चंद्रकांत कर्डक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे, आय काँग्रेसचे सुधीर बाबर, दत्ता फुंदे, राजू काझी, अशोक काळे, जाफर काझी, सतीश भाडाईत, बबन काळे, तान्हा सोनवणे, अण्णासाहेब जाधव, कस्तुरा मगर उपस्थित होते. आंदोलकांशी शेवगाव नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी बी. डी. राठोड, नगर परिषदेचे कर अधिकारी डी.सी. साळवे यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

आंदोलकांच्या भावना तीव्र

शेवगाव नगरपरिषदेशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांबाबत प्रत्येकवेळी आंदोलनच करावे लागते. आंदोलन केल्यानंतरच प्रशासनाला जाग येऊन प्रश्न सुटणार असतील तर प्रशासनाचा पांढरा हत्ती का पोसायचा, असा सवाल आंदोलकांमधून व्यक्त केला जात होता. त्यातून त्यांच्या तीव्र भावना व्यक्त दिसून आल्या.

आंदोलनापासून नगरसेवक दूरच

कर्मचार्‍यांच्या व अन्य मागण्यांसाठी आज झालेल्या आंदोलनाकडे शेवगाव नगरपरिषदेचे कोणीही आजी-माजी नगरसेवक फिरकलेच नाही. यावरून नगरसेवकांची शेवगाव शहर व नागरिकांविषयी असलेली संवेदना लक्षात येते, अशी प्रतिक्रिया या आंदोलनाबाबत नागरीकांमधून व्यक्त होत होती.

Back to top button