नगर : उपविभागीय अभियंत्यावर शाई फेकली | पुढारी

नगर : उपविभागीय अभियंत्यावर शाई फेकली

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर-जामखेड महामार्गावरील निबोंडी ते चिंचोडी पाटील-आठवड पर्यंत रस्त्यावर क्रॉसिंग पट्टे व गतिरोधक बसविण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे जनआधार सामाजिक संघटनेने केली होती. वारंवार मागणी करूनही कार्यवाही न केल्याने संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी बुधवारी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे उपविभागीय अभियंता दि. ना. तारडे यांच्यावर शाई फेकली.

नगर-जामखेड महामार्गावरील निबोंडी ते चिंचोडी पाटील-आठवड गावा पर्यंत परिसरात मोठे अपघात होत आहेत. पोलिस प्रशासनाच्या नोंदीनुसार वेगवेगळ्या अपघातमध्ये अनेक निष्पाप व्यक्तींचा जीव गेला आहे. सामान्यांचा जीव कीड्या-मुंग्याप्रमाणे जात आहे. संबंधित अधिकार्‍यांना अनेकांचा जीव जाऊन देखील जाग आलेली नाही. अधिकार्‍यांना जाग आणण्यासाठी त्यांचावर शाईफेक करण्यात आली असल्याचे प्रकाश पोटे यांनी सांगितले.

दरम्यान, रस्त्यावर क्रॉसिंग पट्टे व गतिरोधक बसविण्याचे काम पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Back to top button