नगर : गुरुजींची ‘शब्द’ परीक्षा! अर्ज माघारीला उरले तीन दिवस; सस्पेन्स कायम | पुढारी

नगर : गुरुजींची ‘शब्द’ परीक्षा! अर्ज माघारीला उरले तीन दिवस; सस्पेन्स कायम

नगर : पुढारी वृत्तसेवा: शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वच शिक्षक संघटनांच्या इच्छुकांनी विक्रमी 799 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता त्यातील नकोशे अर्ज माघारी घेताना मात्र शिक्षक नेत्यांना घाम फुटण्याची चिन्हे आहेत. विड्रॉल ताब्यात घेण्याची चलाखी शिक्षक नेत्यांनी केली असली, तरी ज्यांना शब्द देवून अर्ज भरायला लावला, अशा इच्छुकांचा ऐनवेळी पत्ता कट केल्यास मतपेटीतून नाराजीचा विस्फोट होण्याची भीतीही शिक्षक नेत्यांना सतावण्याची भीती आहे.

शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी सत्ताधारी बापूसाहेब तांबे, रावसाहेब रोहोकले, आबासाहेब जगताप, डॉ. संजय कळमकर, राजेंद्र शिंदे, कल्याणराव लवांडे, एकनाथ व्यवहारे, दिनेश खोसे या शिक्षक नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. काहींनी आपल्या मंडळांकडून जास्तीत जास्त अर्ज दाखल करून जागा वाटपासाठी एकप्रकारे दबावगट निर्माण केल्याचेही पहायला मिळाले. हे अर्ज भरतेवेळी एकाच तालुक्यातून अनेकांना शब्द देण्यात आले. त्यामुळे इच्छुकांनीही 7 ते 10 हजारांची पदरमोड करून अर्ज दाखल केले. आता तीन दिवसांवर अर्ज माघारी आली आहे.

बँकेसाठी तब्बल 799 इच्छुकांचे अर्ज आहेत. आता यापैकी माघार कोणी घ्यायची, अंतिम उमेदवारी कोणाला द्यायची, याची नेतेमंडळीत खलबते सुरू आहेत. मात्र, हे करत असताना ज्यांना अर्ज दाखल करायला लावला, त्यांना कसे थांबवायला लावायचे, असा प्रश्नही शिक्षक नेत्यांसमोर असणार आहे, तसेच अनेक इच्छुक सहा महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत, अशा लोकांना कोणी थांबवायचे, असाही पेच निर्माण होऊन नाराजी वाढणार आहे.

तालुका – इच्छुक
संगमनेर ः 41
नगर ः 37
पारनेर ः 37
कोपरगाव ः 25
राहाता ः 28
श्रीरामपूर ः 36
जामखेड ः 35
पाथर्डी ः 39
राहुरी ः 25
शेवगाव ः 25
श्रीगोंदा ः 38
कर्जत ः 29
नेवासा ः 38
अकोले ः 26

उमेदवारी एक, पण नाराज अनेक !
प्रत्येक तालुक्यासाठी एक उमेदवारी असताना येथे शिक्षक संघटनांनी आपल्याला 10-10 इच्छुकांना येथे हळद लावून ठेवली आहे. अशाप्रकारे प्रत्येक तालुक्यात सरासरी 30 इच्छुक तयार असून, यापैकी तिरंगी लढत झाल्यास तिघांना उमेदवारी मिळेल, तर तब्बल 27 इच्छुक नाराज होणार आहेत. त्यामुळे आता हे नाराज शिक्षक मंडळी नेमके कोणाचे ‘काम’ करणार, हे निकालानंतरच समजणार आहे.

Back to top button