नगर : 19 गट जाती-जमातीसाठी राखीव; 43 गटांत महिलाराज; इच्छुकांची धाकधूक वाढली | पुढारी

नगर : 19 गट जाती-जमातीसाठी राखीव; 43 गटांत महिलाराज; इच्छुकांची धाकधूक वाढली

नगर : पुढारी वृत्तसेवा: अनेक दिवसांपासून इच्छुकांचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद गट व गण आरक्षणाचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. बुधवारी (दि.13 जुलै) जिल्हाधिकारी 85 गटांचे आरक्षण नगर मुख्यालयी काढतील, तर त्याच दिवशी स्थानिक तहसीलदार पंचायत समिती गणांची सोडत करणार आहेत. दरम्यान, 11 गट अनु.जातीसाठी तर 8 गट जमाती तसेच 43 गट महिलांसाठी राखीव असणार आहेत. आपल्या गटात कोणते आरक्षण निघणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून, अनेकांनी आपल्या गट-गणात ‘आरक्षण’ पडू नये, यासाठी विठ्ठलाचा धावा सुरू केला आहे.

जिल्हा परिषदेचा कार्यकाल 20 मार्च 2022 रोजी संपला होता. मात्र, गट-गण रचना, हरकती, आरक्षण सोडत प्रलंबित असल्याने सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यामुळे 21 मार्चपासून जिल्हा परिषदेत प्रशासकराज आले. मात्र, तत्पूर्वी तत्कालिन सीईओ राजेंद्र क्षीरसागर यांची अचानक बढतीवर बदली झाली. या बदलीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. त्यानंतर अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी प्रशासक पदाची जबाबदारी स्वीकारली. पुढे सीईओ म्हणून आशिष येरेकर यांची येथे नियुक्ती झाली. दरम्यानच्या कालावधीत कोरोना संकट काही प्रमाणात दूर झाल्याने निवडणूक घेण्याचा निर्णय झाला.

गेल्यावेळी 73 गट आणि 146 गण होते. यंदा त्यात 12 गट आणि 24 गणांची वाढ झाली. गट-गण वाढल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे. 85 गट आणि 170 गणांची अंतिम रचना पूर्ण झाली आहे. आता इच्छुकांच्या आरक्षण सोडतीकडे नजरा लागलेल्या आहेत. त्यात, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याने सर्वसाधारणच्या जागा वाढणार आहे. त्याचबरोबरोबर अनुसूचित जाती व जमातीच्या जागेतही एक-दोनने भर पडणार आहे.

शिवाय 50 टक्के आरक्षण गृहीत धरून महिलांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळेच अनुसूचित जाती-जमाती व महिलेचे आरक्षण आपल्या गटात पडले तर .., या चिंतेने अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून आरक्षण सोडतीच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी हे 85 गटांचे, तर तहसीलदार 170 गणांचे आरक्षण तालुक्याच्या ठिकाणी काढणार आहेत. अनुसूचित जाती व जमातीची उतरत्या लोकसंख्येनुसार व चक्रानुक्रमाचे पालन करत ही आरक्षण सोडत होणार आहे.

गट व गण आरक्षण कार्यक्रम
7 जुलै : आरक्षण सोडतीची सूचना प्रसिध्द
13 जुलै : गट व गणांची आरक्षण सोडत
15 जुलै : आरक्षणाची प्रारुप यादी प्रसिध्द
15-21 जुलै : हरकती व सूचना मागविणार
25 जुलै : सुनावणी पूर्ण करून अहवाल आयोगाला सादर
29 जुलै : निवडणूक आयोगाकडून आरक्षणास मान्यता
2 ऑगस्ट : गट- गणांचे अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिध्द होणार

या दिग्गजांच्या गटांतील आरक्षणाकडे नजरा !
राजश्री घुले (दहिगावने), शालिनीताई विखे (लोणी), मीरा शेटे (साकूर), अनुराधा नागवडे (बेलवंडी), शशिकला पाटील (वांबोरी), सुनीता भांगरे (राजूर), सुप्रिया झावरे ( ढवळपुरी), सुवर्णा जगताप ( मांडवगण), राणी लंके (सुपा), प्रभावती ढाकणे (भालगाव), काशीनाथ दाते ( टाकळी ढोकेश्वर), सुनील गडाख (खरवंडी/शिंगणापूर), प्रताप शेळके (देहरे/वडगाव गुप्ता), राजेश परजणे (संवत्सर), जालिंदर वाकचौरे (देवठाण), कैलास वाकचौरे (धामणगाव), शरद नवले ( बेलापूर).

Back to top button