नगर : श्रीगोंदा तालुक्यात शिक्षकांच्या तब्बल 88 जागा रिक्त | पुढारी

नगर : श्रीगोंदा तालुक्यात शिक्षकांच्या तब्बल 88 जागा रिक्त

श्रीगोंदा : पुढारी वृृत्तसेवा : जिल्हा परिषदेची शाळा सुरू होऊन जवळपास 15 दिवस उलटले, तरी अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत आहे. शिक्षकांच्या तब्बल 88 जागा रिक्त असल्याने शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

श्रीगोंदा तालुक्यात खासगी शाळांचे मोठे पेव फुटले आहे. या शाळांमधून मिळणार्‍या सेवासुविधा, शिक्षण याच्यांशी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना स्पर्धा करावी लागते आहे. तालुक्यातील बहुतांश शाळांचा दर्जा चांगला असल्याने विद्यार्थी पट मोठा आहे. वस्ती शाळांमधूनही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्या गेल्याने काही वर्षात विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळांकडे कल वाढला आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून काही ठिकाणी शिक्षकांच्या रिक्त जागांची अडचण येऊ लागली आहे. बेलवंडी शाळेत शिक्षक नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले होते. प्रभारी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी तत्काळ धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढत शिक्षक उपलब्ध करून दिल्यानंतर शाळा पूर्ववत सुरू करण्यात आली.

जिल्हा परिषदेकडे केली मागणी

प्रभारी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे म्हणाले, वेगवेगळ्या कारणाने शिक्षकांसह केंद्रप्रमुखांच्या 88 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर नियुक्ती देण्याची मागणी आपण जिल्हा परिषदेकडे केली आहे. लवकरच या जागा भरल्या जातील.

कोकणगावमध्येही शिक्षक नाही

कोकणगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या तीन जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर तत्काळ शिक्षक नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

या आहेत रिक्त जागा
  • विस्तार अधिकारी – 2
  • केंद्रप्रमुख -19
  • पदवीधर शिक्षक -25
  • मुख्याध्यापक -7
  • उपाध्यापक -35

Back to top button